जंगलातील नैसर्गिक झऱ्य़ासह पाणवठय़ांचा श्वास झाला मोकळा, वन विभागाकडून स्वच्छता मोहिम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वनांमधील नैसर्गिक झरे बुजल्याने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील प्रादेशिक वन विभागाने राई, कंदलगाव वनक्षेत्रातील पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेऊन झरे आणि पाणवठे स्वच्छ केले आहेत.

351.16 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ लाभलेल्या राधानगरी वनामधील पाणवठे शिशिर ऋतूच्या अखेर होणारी पानगळ आणि प्राण्यांच्या हालचालींमुळे बुजतात. नैसर्गिक पाणवठे गाडले गेल्याने वसंत ऋतूच्या सुरुवातीस वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. गव्यासारखे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वनाबाहेर येतात आणि शेतातील ऊस आणि इतर पिकांची नासधूस करतात. त्यामुळे शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष वाढतो. याबाबत प्रादेशिक वन विभागाने दखल घेत कंदलगाव वनहद्दीतील राईच्या वनातील पाणवठे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेऊन ती पार पाडली.

वनक्षेत्रपाल एस. बी. बिराजदार, वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक आर. के. गुशिंगे, तानाजी गुरव, धोंडीराम सुतार, उत्तम गुरव, रमेश साबळे, नामदेव कुसाळे, रामचंद्र चौगले, दीपक कांबळे, तरसंबळेकर यांच्यासह वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्य़ांनी नैसर्गिक झऱ्य़ांतील गाळ, झाडांचा पालापाचोळा काढून नैसर्गिक झऱ्य़ांना मोकळा श्वास देण्याचे काम सुरू केले आहे.