
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांमध्ये सद्यस्थितीत 450928 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसाला होणाऱया 3850 दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाचा विचार करता हे पाणी ऑगस्टपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईकरांवर सद्यस्थितीत तरी पाणीकपात ओढवणार नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र गेल्या दोन वर्षांत हा साठा कमी असल्याने मुंबईत उन्हाळाअखेर 10 ते 15 टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्याची वेळ येत आहे. मात्र सद्यस्थितीत ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा असला तरी वेळेत पाऊस झाला नाही तर पाण्याचे नियोजन करावे लागू शकते.
13 एप्रिल रोजी तीन वर्षांचा पाणीसाठा
2021 450928 31.16
2020 491756 33.98
2019 342824 23.69
सद्यस्थितीचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव पाणीसाठा टक्केवारी
अप्पर वैतरणा 75726 33.35
मोडकसागर 44653 34.63
तानसा 31672 21.83
मध्य वैतरणा 43228 22.34
भातसा 237551 33.13
विहार 14257 51.57
तुलसी 3841 47.74































































