शांतीदूतचा जलयज्ञ दररोज भागवतोय हजारो प्रवाशांची तहान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरातील रेल्वेस्थानकावर शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाणपोईद्वारे हजारो प्रवाशांची तहान भागवली जात आहे. मागील २० वर्षापासून शांतीदूत सेवाभावी संस्था परभणी हा उपक्रम अविरतपणे राबवित असून उन्हाळ्यात सुमारे १०१ दिवस प्रवाशांना मोफत शुद्ध व थंड पाणी पुरविण्यात येते. यावर्षी २३ मार्च रोजी येथील बालाजी मंदिराचे महंत रघुनाथदासजी यांच्याहस्ते या जलयज्ञाची सुरुवात करण्यात आली. दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवाशांना पाण्याचे वितरण करण्यात येते.

यावर्षीच्या तीव्र उन्हाळ्यामुळे रेल्वेस्थानकावर येणारे हजारो सामान्य प्रवाशी या उपक्रमाचा आनंद उपभोगत आहेत. बाटलीबंद पाणी सर्वसामान्य प्रवाशांना घेणे परवडत नसल्याने शांतीदूतच्या मोफत जलयज्ञाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. पुण्याच्या या कामाचे जनतेकडून मिळालेल्या आशीर्वादाने समाधान व्यक्त होत असल्याचे शांतीदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांनी सांगीतले.

परभणी रेल्वेस्थानकावरुन दररोज ५५ रेल्वे गाड्यांचे आवागमन होते. त्यामुळे सुमारे १० हजार प्रवाशी दररोज या जलयज्ञातील शितल पाण्याने आपली तहान भागवत आहेत. प्रतिदिन १४ ते १६ तास चालणाऱ्या या उपक्रमात संस्थाध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांच्या समवेत बी.एस. वर्मा, जगदिश जोशी, सुभाष काबरा, ब्रिजलाल गगराणी, भगिरथ सोमाणी, सत्यनारायण चांडक, विठूबाई चव्हाण, जे.एम. चौधरी, दुर्गादास बंग, कांतीलाल जैन, महेश गोला, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, डॉ. सालेहा कौसर, डॉ. दिनेश भुतडा, केदारनाथ सारडा, डॉ. रितेश अग्रवाल, बालाजी शिंदे, वैभव गायकवाड, प्रकाश झाडे, भगवान काकनाळे, आकाश गायकवाड आदी संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेतात. विशेष म्हणजे संभाजीनगर येथील समाजसेवक भीकचंद चिंचाणी यांनी रेल्वेतील प्रवाशांना त्यांच्या डब्यापर्यंत जावून पाणी वाटप करण्यासाठी मोठ्या स्टिलच्या टाक्या व दोन ट्राली उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकतेच पुणे येथील सीआयडीचे आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर व शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नांवदर हे संस्थेच्या या उपक्रमास भेट देण्यासाठी उपस्थित राहून त्यांनी एक दिवसभर पाणी वाटपाच्या सेवेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.