धुळ्यातील 57 गावांची तहान भागणार, पेयजल योजनेवरील स्थगिती केंद्राने उठवली

21

सामना प्रतिनिधी, धुळे

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिलेली स्थगिती आज अखेर उठवली. त्यामुळे या योजनेत धुळे जिल्हय़ातील 42 नव्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला. या योजनांमुळे जिल्हाभरातील 57 गावांची तहान भागणार आहे.

केंद्र सरकारने मार्च महिन्यात देशभरातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला स्थगिती दिली होती. त्यामध्ये धुळे जिह्यातीलही काही योजनांचा समावेश होता. या बंदीमुळे मागील वर्षामध्ये खूपच कमी योजना राज्यामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती उठवण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा आणि जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे ही स्थगिती उठवण्याची मागणी केली. लोणीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील पाणी पुरवठा योजनेवरील स्थगिती उठवली. त्याचप्रमाणे 2018-19 चा आराखडा तयार करण्यात आला. या आराखडय़ात धुळे जिह्यातील 57 वाडय़ावस्त्यांसाठी 42 योजनांचा समावेशक आराखडा करण्यात आला. या एकूण सर्व योजनांसाठी एकूण 41 कोटी 49 लाखांच्या आराखडय़ास अंतिम मंजुरी देण्यात आली.

या नव्या आराखडय़ात जिह्यातील जवळपास सर्वच टँकरग्रस्त गावांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. या प्रकारे या वर्षीच्या राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत बांधलेल्या शौचालयांना निधी असे जिह्यासाठी एकत्रित पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून 106 कोटी 80 लाख रुपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
-बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा आणि जलसंधारण मंत्री

summary- water supply for dhule

आपली प्रतिक्रिया द्या