जामखेड शहरासह तालुक्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईच्या झळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड शहरासाठी उजणी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे फक्त आश्वासन देण्यात येते. मात्र, ही योजना प्रत्यक्षात येत नसल्याने तालुक्यात 27 ठिकाणी आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहर वाशियांना 12 दिवसातून एकदा एक तास पाणी मिळत आहे. प्रतिदिन प्रतिमाणसी 30 लिटर पाणी मिळणे हे फक्त कागदावरच आहे. उजणी धरणातील पाणीपुरवठा योजना शहरवासीयांसाठी मृगजळ ठरत आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावे वाड्या वस्तींसह शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जामखेडला आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणीसाठा मृत साठ्यात आहे. त्यामुळे चारीतून पाण्याच्या टाकीत येणारे पाणी तीन दिवसांपासून बंद झाले आहे.जामखेडला आता टँकरशिवाय पर्याय राहिला नाही. नगर पालिकेचे नियोजन फसल्याने हॉटस्पॉटचे नियम पाळत पाणी पुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अगोदरच दहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा यामुळे लांबणार आहे. शहराचा काही भाग व वाड्यावस्त्यांसाठी वीस दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तेथे आता टँकर सुरू करण्यात आले आहेत.मधल्या काळात तलावातून होणाऱ्या बेकायदा पाणी उपशाकडे दुर्लक्ष झाल्याने ही वेळ आली आहे. पावसाळ्याच्या शेवटी आढावा घेतला तेव्हा शहराला जूनपर्यंत पुरेल, एवढा पाणीसाठा तलावात होता. मात्र, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शेतीसाठी बेकायदा पाणी उपसा झाला आणि मे महिन्यातच पाणी संपले.

गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाउन आहे. हॉटस्पॉट असल्याने शहरातील नागरिकांवर अनेक निर्बंध आहेत. अन्य जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. त्यात आता पाण्याची भर पडली आहे. आधीच आर्थिक चणचण असलेल्या नागरिकांना आता विकतचे पाणी घ्यावे लागणार आहे. ते मिळविण्यासाठीही मोठी धडपड करावी लागणार आहे. शहरात सध्या टँकर सुरू आहेत, ते पाणी पुरत नसल्याने विकत घ्यावे लागत आहे. नगरपालिकेचे नियोजन फसल्याने ही वेळ आल्याचे नागरिक सांगतात.

तालुक्यात 8 टँकरद्वारे 27 ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे. यात अरणगाव, पिंपरखेड, हासनाबाद, पाटोदा फक्राबाद, धानोरा, डोणगाव, हळगाव, बावी या गावांसह 27 ठिकाणी आठ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. तसेच सारोळा व शिऊर या ठिकाणी नविन प्रस्ताव दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या वेळी तालुक्यातील ग्रामीण भागात 58 टँकरने पाणीपुरवठा होत होता. तर शहरासाठी 34 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. जामखेड शहरासाठी भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होत आहे. शहराबरोबर बटेवाडी, जमादारवाडी, लेहनेवाडी, चुंबळी, जांबवाडी, भुतवडा व धोत्री या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे. भुतवडा तलाव मृतसाठ्यात असून चारीतुन पाणी येणे बंद झाले आहे. सध्या टँकरशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत तलावात विद्युत मोटारी टाकून चारीत पाणी टाकणे आवश्यक आहे तरच नागरिकांना बारा दिवसानंतर का होईना पाणी मिळेल.