
सामना प्रतिनिधी । येवला
येवला तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत नसल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. समाधानाची बाब म्हणजे काही टंचाईग्रस्त गावांत पाऊस पडल्याने आतापर्यंत वीस टँकर कमी झाले आहेत. परंतु तरीही 46 टँकरने रोज 106 खेपांतून 84 गावे-वाड्यांची तहान भागविली जात आहे. चारही बाजूला हिरवेग, पण घरात प्यायला पाणी नाही अशी विचित्र स्थिती टंचाईग्रस्त गावांची पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पाऊस येवलेकरांचा अंत पाहत आहे. मार्च ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 पासूनच तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी जाणीवपूर्वक उशिराने मंजुरी दिल्याने मार्च 2018 पासून तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून तो अद्यापही सुरूच आहे. पालखेडच्या लाभक्षेत्रातील आणि येवल्याच्या पश्चिम भागातील गावात काहीसे पावसाने चांगले आगमन केल्याने या भागातील बहुतांशी गावांचे टँकर बंद झाले आहेत.
अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात अद्याप भारम, रहाडी, सायगाव, धामणगाव, खरवंडी हा पट्टा सोडला तर इतरत्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आजही गावोगावी पिण्यासाठी पाणी नसल्याचे विदारक चित्र आहे. तालुक्यात नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याठाक असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आजही 86 गावे-वस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे या गावात टँकर पोहोचला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती व हाल होतच असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र लागून आहे. तालुक्यात मेच्या तप्त उन्हाळय़ात 64 टँकरद्वारे 115 गावे, वस्त्यांना रोज 130 खेपा पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र 57 टँकरद्वारे 56 गावे व 43 वाड्यांना रोज 120 खेपांद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आज मात्र 48 गावे 36 वाड्यांना 46 टँकरद्वारे रोज 103 खेपा पाणी पुरवले जात आहे.
गेल्या महिनाभरात पश्चिम पट्टय़ातील पारेगाव, बदापूर, चिचोडी, अंगणगाव, वळदगाव, शिरसगाव लौकी, आंबेगाव, कानडी आदी 31 गावांसह वाड्याचे 20 टँकर अन् 27 खेपा बंद झाल्या आहेत. ही समाधानाची बाब असली तरी नागरिक व प्रशासनाला मात्र सगळे टँकर बंद होईल इतका पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे.



























































