
WCL 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 241 धावा करत ऑस्ट्रेलियाला 242 धावांचे आव्हान दिलं आहे. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सच्या वादळाचा तडाखा ऑस्ट्रेलियाला चांगलाच बसला. त्याने 39 चेंडूंमध्ये झंझावाती खेळी करत शतक ठोकलं आहे. तसेच त्याच्यासोबत सलामी आलेल्या स्मट्सनेही हात धुवून घेत 90 धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराच्या निर्णयाचा मान ठेवत सलामीला आलेल्या स्मट्स आणि एबी डिव्हिलियर्सने संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघेही अक्षरश: ऑस्ट्रेलियावर तुटून पडले होते. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 187 धावांची भागी केली. एबी डिव्हिलियर्सने 39 चेंडूंमध्ये शतक आणि 46 चेंडूंमध्ये 123 धावा चोपून काढल्या. यामध्ये 15 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली. तर स्मट्सने 53 चेंडूंमध्ये 85 धावा करत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या दोघांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसी कामगिरी करता आला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 6 गड्यांच्या मोबदल्यात 241 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं.