
आम्ही देशाचे शत्रू नाही, तर भाजपचे शत्रू आहोत. महात्मा गांधीजींच्या देशावर आमचा विश्वास आहे, असे म्हणत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
आमची गँग नाही. आमच्या पक्षांची एक राजकीय आघाडी आहे. जे लोक आम्हाला गँग म्हणत आहेत ते सर्वात मोठे दरोडेखोर आहेत. म्हणूनच ते सर्वांना गँगच्या नजरेने पाहत आहेत, असा टोला फारुख अब्दुल्ला यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
कलम 370 लागू करण्याच्या समर्थनार्थ असलेले सर्व पक्ष एकत्रितपणे जम्मू-कश्मीर जिल्हा विकास परिषदेची निवडणूक लढवीत असल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले आहे. कलम 370 लागू करण्यासाठी गुपकार डिक्लेरेशननुसार सर्व पक्ष एक झाले आहेत.
या आघाडीतील सर्व पक्ष जिल्हा विकास परिषदेची निवडणूक एकत्रपणे लढवत आहेत. पण या आघाडीला निवडणूक चिन्ह मिळू शकत नाही. त्यामुळे आपापल्या पक्षाच्या चिन्हावर संयुक्त उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

























































