चटपटीत बातमी, मशीन मधून मिळणार मनपसंत पाणीपुरी

सामना ऑनलाईन / बंगळुरू

पाणीपुरी चाहत्यांसाठी खूशखबर आहे. आता आपल्याला ठेल्यावर किंवा गाडीवर कुणी व्यक्ती नाही तर मशीन पाणीपुरी खाऊ घालणार आहे. नुकतेच बंगळुरू मध्ये पाणीपुरी खाऊ घालणाऱ्या दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. या मशीनमुळे आता पाणीपुरीचे चाहते स्वत:च्या हाताने आपल्या मनपसंत पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये कुठेही स्वच्छतेचा प्रश्न येत नसल्याने आपल्या तब्बेतीला कोणतेही नुकसान होणार नाही, त्यामुळे मनमूरादपणे आपण पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतो.

या मशीनमध्ये दोन कंटेनर बसवण्यात आले आहेत, एकामध्ये गोड पाणी तर दुसऱ्यामध्ये तिखट पाणी. यामुळे ग्राहक आता त्यांच्या पसंतीचे आंबटगोड, तिखट पाणी निवडू शकतात व हव्या तशा चवेची पाणीपुरी खाऊ शकतात. त्यामुळे आता पाणीपुरी विक्रेत्याला सारखे तीखट-गोड पाण्याचे प्रमाण सांगण्याची झंजट दूर होणार आहे.
यातील एक मशीन ईटीए मॉल, विनयपेठ येथे  तर दुसरे जीटी मॉल, मगडी रोड या ठिकाणी लावण्यात आले आहे. अहमदाबाद येथील पाणीपुरी विक्री करणाऱ्या वॉटर शॉट्स या खाजगी कंपनीने या मशीनची निर्मिती केली आहे. या मशीनची किंमत 6लाख इतकी असून हे देशातील पहिले पाणीपुरी वेंडिंग मशीन आहे. हे मशीन पहिल्यांदा अहमदाबाद येथे लावण्यात आले होते. या मशीनचा मूख्य हेतू हा आहे की, ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेता यावा.