
सामना ऑनलाईन । उदयपूर
‘प्रभू रामचंद्राचे काम करायचे आहे आणि रामरायाचे हे काम होणारच’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिराची घंटा वाजवली. या कामाची देखरेख करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, असेही ते म्हणाले.
उदयपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिक्षावर्ग चालू आहे. यावेळी संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना मोहन भागवत बोलत होते. आता आपल्याला प्रभू रामचंद्राचे काम करायचे आहे आणि हे काम होणारच! असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रामाचे काम म्हणजे आपलेच काम. आपले काम आपण स्वतः केले तर व्यवस्थित होते. हेच काम दुसऱयाला सोपवले तर त्यावर निगराणी ठेवावी लागते.
संघ स्वयंसेवकांच्या या शिक्षावर्गाला संत मुरारीबापू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मुरारीबापू यांनी प्रभू रामाचे काम सर्वांना मिळून करायचे आहे असे सांगितले. हाच धागा पकडून मोहन भागवत यांनी अयोध्येतील राममंदिरासंदर्भात अप्रत्यक्ष विधान केले. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर संघाने राममंदिराच्या अनुषंगाने भाजप सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राममंदिरासाठी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणीही संघाने अनेकदा केली मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत राममंदिरासंदर्भात कोणत्याही पर्यायाचा विचार केला जाणार नाही अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती.

























































