आम्ही नक्कीच जिंकणार आणि तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणार; अभिषेक बॅनर्जींचा भाजपवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “आगामी निवडणुकीत आम्ही केवळ विजयच मिळवणार नाही, तर भाजपला बंगालमधून बाहेरचा रस्ता दाखवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दक्षिण २४ परगणा येथे आयोजित एका भव्य जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपवर तिखट शब्दांत टीका केली.

अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर धमकावण्याचे राजकारण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा (ED, CBI) वापर करून आमच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण बंगालची जनता विकली जाणारी नाही. ही भूमी क्रांतीची आहे आणि इथला माणूस दिल्लीच्या अहंकारासमोर कधीही झुकणार नाही.” भाजपला बंगालची संस्कृती आणि इथल्या लोकांच्या भावना कधीच समजणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या लक्ष्मी भंडार, कन्याश्री आणि स्वास्थ्य साथी, यांसारख्या योजनांचा उल्लेख करत अभिषेक बॅनर्जी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. “आम्ही केलेल्या कामाची पावती जनता आम्हाला मतपेटीतून देईल. भाजप केवळ निवडणुका आल्यावरच हिंदू-मुस्लिम राजकारण करते, पण आम्ही वर्षभर जनतेच्या सेवेसाठी जमिनीवर काम करतो,” असे ते म्हणाले.