वेब न्यूज – एक लग्न असेही…

>> स्पायडरमॅन

सध्या सोशल मीडियावर ‘लग्न’ या विषयावरच्या दोन घटनांच्या पोस्ट जबरदस्त धुमाकूळ घालत आहेत. त्यातील एक घटना आहे, उत्तराखंडमधल्या हरीद्वारा इथली. हारीद्वारामधील रवी नावाच्या एका व्यक्तीचे नुकतेच लग्न झाले. रवीने आपल्या मित्रांना देखील लग्नाचे अगदी खास आमंत्रण दिले होते. पत्रिकेमध्ये संध्याकाळी पाच वाजताची वेळ ही वरातीची वेळ म्हणून देण्यात आली होती. पत्रिकेतील वेळेप्रमाणे रवीचे मित्र वरातीसाठी पोहोचले, तर त्यांना कळले की वरात तर आधीच निघून गेली आहे. वेळेवर पोहोचून देखील असे अनुभवाला आल्यावर, नाराज झालेल्या रवीच्या मित्रांनी त्याला फोन केला. आपली चूक मान्य करून, माफी मागण्याऐवजी रवीने त्यांना परत निघून जाण्याचा अपमानजनक सल्ला दिला. आधीच नाराज झालेले मित्र या सल्ल्याने अधिक संतापले आणि त्यांनी चक्क वकिलाच्या माध्यमातून रवीवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वकिलाच्या माध्यमातून रवीला बिनशर्त माफी मागण्याचीं सोबतच भरपाई म्हणून पन्नास लाख रुपयांची देखील मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास त्याच्यावर खटला दाखल करणार असल्याचे देखील कळवले आहे.

दुसरीकडे कर्नाटकामध्ये नुकतेच या जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात करण्यात आलेले, शोभा आणि चंदप्पा या जोडप्याचे लग्न देखील चांगलेच चर्चेत आहे. नेहमीच्या लग्नाप्रमाणे सर्व चालीरीती आणि विधींचे पालन करून हे लग्न लावण्यात आले. मग ते चर्चेत का आले? कारण शोभा आणि चंदप्पा दोघांना मरून 30 वर्षे झालेली आहेत. दचकलात ना? कर्नाटकातील काही भागात ही प्रथा असून, जन्मानंतर कमी कालावधीत लगेच मृत्यू पावलेल्या आपल्या परिजनांचे लग्न लावून देण्याची इथे प्रथा आहे. हा त्यांचा सन्मान समजला जातो. विधीपरंपरेनुसार पार पडणाऱ्या या लग्नात लहान मुले आणि अविवाहित लोक मात्र हजेरी लावू शकत नाहीत. त्यांना हे लग्न बघण्याची परवानगी नसते. या प्रथेला ’प्रेथा कल्याणम’ असे संबोधले जाते.