वेब न्यूज – द कूल बीटल

वाढते प्रदूषण ही एक मोठी जागतिक समस्या बनलेली आहे. जगभरातील अनेक तज्ञ या समस्येवर काम करत आहेत. प्रदूषण आणि प्रदूषणामुळे होणारे जागतिक दुष्परिणाम रोखणे, कमी करणे यासाठी विविध उपाय शोधले जात आहेत आणि नवनव्या गोष्टींवर संशोधनदेखील केले जात आहे. अशाच एका अनोख्या संशोधनात शास्त्र्ाज्ञांना थायलंड आणि इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखीजवळ निओसेराम्बायक्स गिगास या प्रजातीतील विशिष्ट बीटल किडे आढळले, जे अतिशय असामान्य अशा वातावरणातदेखील जिवंत राहू शकतात. हे असामान्य तापमान म्हणजे जे नियमितपणे 105 डिग्री फॅरेनहाइटच्या आसपास असते आणि ज्याच्यामुळे जमिनीचे तापमान तब्बल 158 डिग्रीपर्यंत वाढत जाते. अशा वातावरणात तग धरणाऱया या बीटल्सनी शास्त्र्ाज्ञांचे लक्ष वेधले नसते तर नवलच. याच्या पंखामध्ये असलेली अद्भुत रचना आणि त्याच्या शरीराची सूर्यप्रकाश परावर्तित करू शकणारी त्रिकोणी फ्लफ संरचना यामुळे हे बीटल्स शरीराचे तापमान थंड राखून अशा वातावरणातही तग धरू शकतात. बीटल्सच्या याच वैशिष्टय़ांचा अभ्यास करून आता शास्त्र्ाज्ञांनी एक विशिष्ट प्रकारचे कोटिंग (आवरण) बनवले आहे, जे की आपल्या कार, मोबाईलसाठी वापरता येईल. भर उन्हाळ्यात एखादी काळ्या रंगाची कार ही इतर रंगांच्या गाडय़ांपेक्षा अधिक सूर्यप्रकाश अर्थात उष्णता शोषून घेते आणि अधिक प्रमाणात गाडीचा आतील भाग गरम बनवते. अशा वेळी हा अधिक तप्त भाग गारव्यात बदलण्यासाठी मोठय़ा प्रमाणात इंधन खर्ची पडते आणि त्यामुळे घातक वायूचे उत्सर्जन होते ते वेगळेच. जेव्हा बीटल्सच्या मदतीने बनवलेल्या कोटिंगची फिल्म विविध वस्तूंवर वापरण्यात आली, तेव्हा तिने तब्बल 9 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत उष्णता कमी करून दाखवण्यात यश मिळवले. आता लवकरच अशा फिल्म्स कार, मोबाईल, काचेच्या इमारतींच्या तावदानावर उष्णता प्रतिबंधक कोटिंग म्हणून दिसायला लागल्या तर आश्चर्य नाही.

आपली प्रतिक्रिया द्या