वेब न्यूज – फेसबुक पुन्हा अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संकटे आणि फेसबुक यांचे गेल्या काही काळापासून काय नाते जुळले आहे, ते काही कळायला मार्ग नाही. एका संकटातून बाहेर पडेपर्यंत अजून एक नवे संकट फेसबुकची जणू वाटच बघत बसलेले असते. अर्थात फेसबुकदेखील काही फार सोज्वळ आणि सर्व कायद्यांचे पालन वगैरे करणारी गुणी कंपनी आहे असे नाही. त्यामुळेच फेसबुकला सतत कुठल्या ना कुठल्या कायदेशीर अडचणीला जगभर तोंड द्यावे लागतच असते, पण यावेळचे संकट हे जरा फेसबुकला जडच जाणारे आहे असे दिसते. कारण अमेरिकेतील तब्बल चाळीसपेक्षा अधिक राज्यांचा एक गट मिळून फेसबुकवर गुन्हा दाखल करणार आहे. फेसबुकने त्याच्या वापरकर्त्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे आणि गोपनीयतेच्या कायद्याचेदेखील उल्लंघन केले आहे असे आरोप लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत एखाद्या मोठय़ा टेक कंपनीवर असा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने गुगलवर गुन्हा दाखल केला होता. याआधीदेखील गोपनीयतेचा भंग करणे, डाटा लिकेज, एका विशिष्ट राजकीय पक्षाला मदत होईल असे धोरण राबवणे अशा अनेक आरोपांसाठी फेसबुकला चौकशीला सामोरे जावे लागलेले आहे. याच जोडीला फेसबुक ही जायंट टेक कंपनी आपल्यापेक्षा लहान प्रतिस्पर्ध्यांना मोठय़ा मोठय़ा रकमा देऊन खरेदी करते आणि त्यांना मोठेच होऊ देत नाही असादेखील गंभीर आरोप फेसबुकवर करण्यात येतो. यासाठी फेसबुकने 2012 साली खरेदी केलेले इन्स्टाग्राम आणि 2014 साली खरेदी केलेले व्हॉट्सऍप ही दोन प्रमुख उदाहरणे देण्यात येतात. यासंदर्भात फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याची चौकशीदेखील करण्यात आली होती. याचबरोबर फेसबुकवर एच-1 बी व्हिसाधारकांसदर्भातदेखील एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमेरिकेच्या लोकांना कामाची संधी न देता फेसबुक बाहेरदेशातून आलेल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवून त्यांना नोकऱया बहाल करते आहे असा आरोप अमेरिकन सरकारने लावला आहे.