
मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्ती कधी स्थापन होणार? त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल? हे सर्व कधीपर्यंत शक्य होईल? अशा अनेक प्रश्नांवर जगभरातील संशोधक आणि संस्था काम करत आहेत. विविध प्रकारची साधने त्यासाठी तयार करून त्यांचा अभ्यासदेखील केला जात आहे. हिंदुस्थानदेखील या सर्वात मागे नाही. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरू आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) यांनी मिळून अंतराळात बांधकामासाठी वापरता येईल अशी वीट बनवण्यात यश मिळवले आहे. या विटेच्या मदतीने मंगळ ग्रहावर इमारतसदृश बांधकामे करता येणे शक्य होणार आहे. ‘प्लॉस वन जर्नल’मध्ये इस्रोचे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. ही अनोखी वीट बनवण्यासाठी शास्त्र्ाज्ञांनी मंगळाची सिम्युलंट माती (प्रतिकृती) आणि युरियाचा वापर केला आहे. जिवाणूंवर आधारलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ही खास अंतराळ वीट बनवण्यात आली आहे. संशोधकांनी प्रथम मंगळावरची माती, स्पोरोसार्सिना पेस्टुरी नावाचे जिवाणू, ग्वार गम, युरिया आणि निकेल क्लोराइड एकत्र केले. यानंतर हे द्रावण विटेच्या साच्यांमध्ये ओतण्यात आले. यात असलेल्या जिवाणूंमुळे काही दिवसांनी युरियाचे पॅल्शियम कॉर्बोनेटच्या क्रिस्टल्समध्ये रूपांतर झाले. ISRO आणि IIScच्या शास्त्र्ाज्ञांनी असा प्रयोग ऑगस्ट 2020मध्ये चंद्राच्या मातीवरदेखील केला होता. शास्त्र्ाज्ञांच्या मतानुसार चंद्राच्या मातीवर जो प्रयोग करण्यात आला त्या प्रक्रियेमध्ये केवळ दंडगोलाकार आकाराच्या विटा बनवता येणे शक्य आहे. मात्र या नव्या प्रयोगाच्या यशाने विविध आकाराच्या विटा बनवणे शक्य होणार आहे. खरे तर मंगळाच्या मातीपासून विटा बनवण्याचे काम हे अत्यंत अवघड असे होते. कारण मंगळाच्या मातीत आयर्न ऑक्साईड भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. त्यासाठी निकेल क्लोराईडच्या साहाय्याने ही माती जिवाणूंना अनुकूल अशी बनवली जाते. बॅक्टेरिया त्यांच्या प्रथिनांचा वापर कणांना एकत्र बांधण्यासाठी आणि छिद्रे कमी करण्यासाठी करतात. त्यामुळे मजबूत विटा तयार होण्यास मदत होते.




























































