वेब न्यूज – Project Kuiper

>> स्पायडरमॅन

ऑनलाइन खरेदी म्हटले की, पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते म्हणजे ऍमेझॉन . ऍमेझॉनचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. जगातील सर्वात मोठय़ा या प्लॅटफॉर्मने हळूहळू आपली व्याप्ती वाढवायला सुरुवात केली आणि मग व्हिडीओ स्ट्रीमिंगचा OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video, संगीतप्रेमींसाठी Amazon Music आणि Virtual Assistant Service साठी Ale²a अशा विविध सेवा दाखल केल्या. त्याला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या सर्वाची दखल घेत ऍमेझॉन आता लवकरच आपला सर्वात मोठा असा प्रोजेक्ट घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे Project Kuiper.

Project Kuiperच्या माध्यमातून जगभरात सॅटेलाईटवर आधारित इंटरनेट सेवा पुरवण्याचा ऍमेझॉनचा मनसुबा आहे. सध्या कंपनी या प्रोजेक्टवर वेगाने काम करत आहे. या प्रकल्पांतर्गत ऍमेझॉन इंटरनेट सेवेसाठी पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडणार आहे. ऍमेझॉन गेल्या काही वर्षांपासून Project Kuiper वर काम करत आहे. या प्रकल्पामुळे ऍमेझॉन जागतिक स्तरावर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी बनणार आहे. Project Kuiperची किंमत 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 82 हजार कोटी रुपये आहे. येत्या काही वर्षांमध्ये ऍमेझॉन Project Kuiperअंतर्गत पृथ्वीच्या कक्षेत तीन हजारांहून अधिक इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करेल. हा प्रकल्प पुढील वर्षी म्हणजे 2024 पासून सुरू होईल. त्यानंतर 2026 पर्यंत कंपनी आपले इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करणे सुरू ठेवेल. त्यासाठी या सेवेत वापरल्या जाणाऱया इंटरनेट सॅटेलाईट्सची निर्मिती या वर्षीच मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क याच्या उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा पुरवणाऱया ‘स्टारलिंक’बरोबर ऍमेझॉनची प्रमुख स्पर्धा असणार आहे हे तर उघड आहे.