
निसर्गाच्या किमया अनेकदा मानवी तर्काच्या पलीकडे असतात. चीनमधील जिआंगसू प्रांतात नुकतीच अशीच एक अजब घटना घडली आहे, ज्याने केवळ डॉक्टरच नव्हे तर संपूर्ण जगाला चकित केले आहे. एका शुद्ध चिनी वंशाच्या दांपत्याच्या पोटी एक गोंडस मुलगी जन्माला आली आहे, जिचे केस सोनेरी आणि डोळे निळे आहेत. जेव्हा या चिनी दांपत्याने आपल्या नवजात कन्येला पाहिले, तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. चिनी लोकांचे केस सहसा काळे आणि डोळे गडद असतात. मात्र या मुलीचे रूप पूर्णपणे युरोपियन वंशाच्या मुलांसारखे दिसत होते. सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये बाळ बदलले गेले असावे, असा संशय पालकांना आला होता. हा संशय दूर करण्यासाठी त्यांनी डीएनए (DNA) चाचणी केली आणि अहवालात ती मुलगी त्यांचेच अपत्य असल्याचे सिद्ध झाले.
तज्ञांनी या घटनेचा सखोल अभ्यास केला असता हे रिसेसिव्ह जीन (Recessive Gene) किंवा सुप्त गुणसूत्रांचे प्रकरण असल्याचे समोर आले. संशोधनादरम्यान असे आढळले की, त्या मुलीच्या वडिलांचे पणजोबा रशियन म्हणजेच स्लाव्हिक वंशाचे होते. गेल्या अनेक पिढय़ांपासून हे युरोपियन गुणधर्म कुटुंबात सुप्त अवस्थेत होते. विज्ञानाच्या भाषेत याला अॅटॅविझम (Atavism) म्हणतात, जिथे अनेक पिढय़ांनंतर पूर्वजांचे एखादे वैशिष्टय़ पुन्हा प्रकट होते.
ही बातमी वाऱयासारखी पसरली असून चिनी सोशल मीडियावर या मुलीला जेनेटिक ‘ब्लाइंड बॉक्स’ असे नाव देण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर पूर्वजांच्या रूपाने निसर्गाने दिलेली ही एक दुर्मिळ भेट असल्याचे लोक मानत आहेत. ही घटना आपल्याला याची जाणीव करून देते की, आपली जनुके आपल्या इतिहासाची पाळेमुळे किती खोलवर जपून ठेवतात? डॉक्टरांच्या मते, ही घटना केवळ सौंदर्यापुरती मर्यादित नसून मानवी उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा धडा आहे. दोन आशियाई व्यक्तींमध्ये युरोपियन जनुके इतकी वर्षे जिवंत राहणे ही वैद्यकीय क्षेत्रातील एक दुर्मिळ, पण रंजक बाब मानली जात आहे, ज्याने जनुकीय शास्त्राच्या संशोधनाला नवी दिशा दिली आहे.




























































