वेब न्यूज : मायक्रोसॉफ्ट कीबोर्डवर देणार ऑफिस

21

बटन – तुमच्या आमच्या कीबोर्डवर जसे विंडोजचे बटन आहे, अगदी त्याचप्रमाणे आता मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे बटन देण्याच्या विचारात असल्याची बातमी आहे. या खास बटनासाठी बहुदा मायक्रोसॉफ्ट right Alt बटन किंवा context menu बटन काढून टाकून कीबोर्डवर जागा बनवण्याची शक्यता आहे. या ऑफिस बटनाच्या वापरासाठी बहुदा Office key + Q, T, W, X, P, D, N, Y, आणि L असे कॉम्बिनेशन असण्याची शक्यता आहे. कोडर वॉकिंग कॅट याने केलेल्या खास ट्विटमध्ये या नव्या प्रोजेक्टची माहिती देण्यात आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी. विंडोजसारखे महत्त्वाचे उत्पादन तयार करून मायक्रोसॉफ्टने संगणक विश्वात फार मोठी क्रांती घडवली. याच मायक्रोसॉफ्टने 1994 साली आपल्या नॅचरल कीबोर्डमध्ये पहिल्यांदा विंडोजचे बटन आणले आणि मग अनेक कीबोर्ड निर्मात्यांनीदेखील त्याचे महत्त्व ओळखून आपापल्या कीबोर्डमध्ये या विंडोज बटनासाठी वेगळी जागा तयार केली. आता मायक्रोसॉफ्ट त्याच धर्तीवर ऑफिसच्या बटनावर काम करत असून या प्रोजेक्टला ‘Office key – Compass’ असे नाव देण्यात आले आहे. खात्रीलायक बातमीनुसार सध्या मायक्रोसॉफ्ट दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कीबोर्डवर काम करत असून त्यांना Holgate Low आणि Holgate Mid असे कोडनेम देण्यात आलेले आहे. काही युजर्सना मायक्रोसॉफ्टने हे ऑफिस बटन असलेले कीबोर्ड वापरायला दिले असून आता या युजर्सकडून त्यासंदर्भातील फीडबॅक घेण्याचे काम आता मायक्रोसॉफ्ट करत आहे. 10 मे 2019 रोजी देण्यात आलेल्या विंडोज 10 च्या अपडेटमध्ये या बटनासाठी आवश्यक असे काही अपडेटदेखील पुरवण्यात आले असावेत असे तज्ञ सांगतात. या जोडीलाच मायक्रोसॉफ्ट ‘कील’ नावाच्या एका उपकरणावरदेखील काम करत असल्याचे वृत्त आहे. अर्थात या ‘कील’चा या ऑफिस बटनाच्या प्रोजेक्टशी काय संबंध आहे हे उघड झालेले नाही. खुद्द मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात एका शब्दानेदेखील काही खुलासा केलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या