वेब न्यूज – आता खिशात घेऊन फिरा AC

>> स्पायडरमॅन

उकाडा अन त्यामुळे जिवाची होणारी काहिली हे जगात अनेकांच्या चिडचिडीचे एक प्रमुख कारण आहे. घर, ऑफिसात एक वेळ फॅन, एसी यांचा आसरा घेता येतो, पण रणरणत्या उन्हात बाहेर हिंडावे लागण्यासारखा वैताग नाही. पण आता समजा तुम्हाला तुमच्या कपडय़ातूनच एसी घेऊन फिरता आले तर? उन्हाच्या रखरखीतदेखील शरीराला सतत गारवा पुरवणारा अन् सहजपणे खिशात अथवा खास डिझाइन केलेल्या कपडय़ात घेऊन हिंडता येईल असा ’वेअरेबल’ एसी जपानच्या प्रख्यात सोनी कंपनीने बनवला आहे. छोटय़ा कॉम्प्युटर माऊसच्या आकाराचा असलेला हा एसी तुम्ही कपडय़ांच्या खिशात ठेवू शकता, अथवा खास बनवलेल्या टी-शर्टच्या मागच्या बाजूला ठेवून मस्त गारवा मिळवत राहता. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा एसी दोन ते चार तास बॅकअप देतो. शरीरावरच्या कपडय़ांमधील उष्ण हवा बाहेर काढून फेकण्याचे काम हा एसी करत राहतो. यासाठी या एसीमध्ये एक विशेष पंखा देण्यात आलेला आहे. हा एक स्मार्ट एसी असून, याच्या जोडीने येणाऱया ऍप्लिकेशनच्या मदतीने हा स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे आणि मग स्मार्टफोनच्या मदतीने याचा स्पीड कमी-जास्त करणे शक्य होणार आहे. किंवा या फॅनला ऍटोमॅटिक मोडवरही सेट करता येणार आहे. या Reon Pocket एसीची किंमत 13000 जपानी येन म्हणजेच साधारण 9000 भारतीय रुपये आहे. सध्या हा एसी फक्त जपानमध्येच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या Reon Pocket एसीचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे, थंडीत हा हीटर म्हणूनदेखील आपल्याला वापरता येणार आहे. या फोनच्या वापरासाठी खास डिझाइन केलेले दोन टी-शर्टदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन वेगळय़ा रंगात हे टी-शर्ट उपलब्ध आहेत. या टी-शर्टच्या मदतीने शरीराच्या मागच्या बाजूसदेखील हा एसी ठेवून छानशी हवा खाता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या