वेब न्यूज – भूस्खलनाच्या मागावरती तंत्रज्ञान

775

>> स्पायडरमॅन

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. एखाद्याला निरोप पोचवण्यापासून ते त्याच्या खात्यात पैसे पोचवण्यापर्यंत फक्त एका क्लिकच्या माध्यमातून तुम्हाला सहजपणे हे तंत्रज्ञान मदत करू लागले आहे. उद्योग क्षेत्रापासून ते मानवी आरोग्य आणि इतरही अनेक क्षेत्रांत मानवी आयुष्य सुखकर करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा फारच उपयोग होतो आहे. नैसर्गिक आपत्ती हा सर्व जगालाच भेडसावणारा प्रश्न आहे. पूर, भूकंप, ढगफुटी हे अनेक नैसर्गिक आपत्तीचे शत्रू मानवी जिवाबरोबरच संपत्तीचीदेखील हानी करण्यास सक्षम असतात. या नैसर्गिक आपत्तींपासून लढण्यासाठी, त्यांचा येण्याआधीच मागोवा घेण्यासाठी आणि एकदा आपत्ती घडून गेल्यावरती बचत कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावरती वापर होत असतो. एखादे नैसर्गिक संकट येण्याआधी त्याची पूर्वसूचना मिळावी यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे प्रयत्न जगभरचेच शास्त्रज्ञ करत आहेत. आता हिंदुस्थानातदेखील भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचा आगाऊ मागोवा घेण्यासाठी नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आलेले आहे. हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी अत्यंत स्वस्तात मोबाईलच्या एका सामान्य फिचरचा वापर करून अवघ्या 20000 रुपयांत कार्यरत होणारे हे तंत्रज्ञान बनवण्यात यश मिळवले आहे. भूस्खलनाच्या आपत्तीशी कायमच झुंजत असलेल्या हिमाचल प्रदेशात या तंत्रज्ञानाला विकसित करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिह्यात स्थित असलेल्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेने (आयआयटी) याचा शोध लावला आहे. ‘एक्सलरोमीटर’ हे एक सर्वच स्मार्टफोन मोबाईलमध्ये वापरले जाणारे मोशन सेन्सरचे तंत्रज्ञान आहे. वेगाच्या गतीला आणि हातांच्या हालचालीला प्रतिसाद देत, त्याप्रमाणे मोबाईलचे क्रीन ऍडजस्ट करणारे हे तंत्रज्ञान आहे. याच सेन्सरच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनला तुम्ही मोबाईल कसा पकडला आहे हे कळते आणि त्या हिशेबाने तो क्रीन हॉरिझॉण्टल किंवा व्हर्टिकल ओरिएंटेशनमध्ये घेऊन जातो. याच तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचलात वीस सेन्सर बसवण्यात आले असून, त्यांच्या मदतीनं भविष्यातील भूस्खलनाचे अंदाज लावणे सहजशक्य होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या