
लग्नाला बोलवून वरातीत नेलं नाही म्हणून एका वऱ्हाड्यानेच नवरदेवाला 50 लाखांची नोटीस पाठवली आहे. ही विचित्र वाटणारी घटना उत्तराखंडच्या हरिद्वार येथे घडली आहे.
या नवरदेवाचं नाव रवी असं असून त्याच्या मित्राचं नाव चंद्रशेखर असं आहे. रवीचं लग्न बिजनौर येथील अंजूसोबत ठरलं होतं. रवीने त्याच्या लग्नाची पत्रिका त्याचा मित्र असलेल्या चंद्रशेखरला दिली होती. तसंच त्याने त्याला अन्य काहींनाही पत्रिका वाटण्याचं काम दिलं होतं. त्यात वरात निघण्याची वेळ पाच वाजता दिली होती. त्यामुळे चंद्रशेखर काही वऱ्हाड्यांसह जेव्हा संध्याकाळी 4.50 वाजता रवीच्या लग्नात पोहोचला तेव्हा वरात तिथून पुढे निघून गेली होती.
वरातीची वेळ निघून गेल्याने त्याने रवीला फोन केला. तेव्हा रवीने आपण वरातीसोबत पुढे निघून आलो आहोत, तू परत जा असं उत्तर चंद्रशेखरला दिलं. त्याच्यासोबत असलेल्या वऱ्हाड्यांनी चंद्रशेखरला बोल लावले. त्यामुळे दुखावलेल्या चंद्रशेखरने तडक वकील मित्र असलेल्या अरुण कुमार भदौरिया याच्याशी संपर्क केला.
चंद्रशेखरच्या सांगण्यावरून भदौरिया याने रवीला नोटीस देऊन तीन दिवसांच्या आत माफी मागण्याची आणि नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये देण्याची मागणी केली. असं न केल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही त्यात दिला आहे.

























































