वजन कमी करायचंय? मग मिरच्या खा!

3345

वाढतं वजन ही अनेकांसाठी चिंतेची बाब आहे. वजन कसं कमी करावं, त्यासाठी काय डाएट करावं की व्यायाम करावा असा गोंधळ अनेकांच्या मनात असतो. त्यातला डाएट हा पर्याय अनेक जण स्वीकारताना दिसतात. कारण, त्यात अनेक जिन्नसांचा समावेश होतो आणि खाण्यातही वैविध्य ठेवता येतं. अशांसाठी अजून एक उत्तम पर्याय स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे.

अमेरिकेच्या जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, मिरचीत असलेला कॅपसायसिन हा घटक पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. पण, यासाठी तुम्हाला लाल नव्हे तर हिरव्या मिरच्यांचाच वापर करावा लागेल. हिरव्या मिरचीच्या सेवनाने तुमची चयापचय क्रिया वेगात होते. त्यामुळे तुमची चरबी घटायलाही मदत होते. कारण हिरव्या मिरचीचं सेवन तुमची खोटी भूक (भूक लागलेली नसतानाही होणारी भुकेची भावना) नियंत्रित करण्यासाठी मदत करतं, असं हा अहवाल सांगतो.

पण, मिरचीच्या सेवनाचे काही नियम आहेत. मिरची ही योग्य प्रमाणात आणि शक्यतो सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात सेवन करावी. अनेकांना सकाळी बेसनपोळा किंवा अंड्याचे ऑम्लेट खाण्याची सवय असते. त्यात मसाल्याऐवजी हिरवी मिरची घातल्यास उपयुक्त असते. तसंच दुपारच्या जेवणातल्या पातळ डाळ अगर आमटीमध्ये हिरव्या मिरचीची फोडणी घालण्याची पद्धतही अत्यंत उपयुक्त आहे. मिरचीच्या सेवनाने अतिरिक्त भोजन करण्याची सवयही आटोक्यात येते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या