नवी मुंबई विमानतळावर आपले सहर्ष स्वागत, हजारो प्रवासी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार; दिवसभरात 30 विमानांचे लॅण्डिंग टेकऑफ

गेल्या 18 वर्षांचे स्वप्न आज साकार झाले. देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले लॅण्डिंग आणि टेकऑफ झाले. बंगळुरू येथून आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी
टेकऑफ झालेल्या इंडिगोच्या 6 ई-460 या विमानाचे दीड तासाच्या प्रवासानंतर 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर लॅण्डिंग होताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

ऑस्ट्रेलियातून आणलेल्या वॉटर टँकरने पाण्याचे उंच फवारे उडवून नवी मुंबईच्या भूमीवर उतरलेल्या या पहिल्या प्रवासी विमानाला सलामी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी उद्घोषणा आसमंतात दुमदुमली आणि या ऐतिहासिक क्षणाचे हजारो प्रवासी व नवी मुंबईकर साक्षीदार ठरले. दिवसभरात नवी मुंबई विमानतळावर 30 विमानांचे टेकऑफ आणि लॅण्डिंग झाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले
लॅण्डिंग करण्यासाठी आज सकाळी 6 वाजता इंडिगोचे विमान बंगळुरू विमानतळाच्या धावपट्टीवर आले. त्यानंतर 6 वाजून 20 मिनिटांनी विमानाने टेकऑफ घेतले. नवी मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या या विमानाचे कॅप्टन गौरव निहाल आणि सहकॅप्टन जय जगदीशन होते. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर हे विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरले. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नातू अनुप पाटील यांनी आज या पहिल्या विमानातून बंगळुरू ते नवी मुंबई असा प्रवास केला.

अदानींनी केले स्वागत

पहिल्या विमानातून प्रवास केलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे विमानतळावर उपस्थित होते. विमानतळ व्यवस्थापनाने पहिल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ताण कमी झाला असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे गौतम अदानी यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशभरात उत्सुकता

नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणाऱया प्रवासी सेवेची उत्सुकता आज संपूर्ण देशभर होती. नवी मुंबईतील अनेक नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बंगळुरूवरून येणाऱया पहिल्या विमानाने प्रवास केला. नवी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या आणि विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी विमानतळाभोवती मोठी गर्दी केली होती.