पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 33 आमदार तृणमूलच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या अनेक आमदार व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तृणमूलने तब्बल 200 हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हे आहेत. भाजपचे 33 आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विधानसभा निवडणुकीआधी सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बडय़ा नेत्यांनी कमळ हाती घेतले. सुवेंदू यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता बॅनर्जी यांनी राज्याची सत्ता कायम राखत भाजप नेत्यांचे पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशू हेदेखील तृणमूलमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून येत्या काही दिवसांत भाजपला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे.

अभिषेक बॅनर्जींसोबत बंद दाराआड चर्चा
भाजप नेते मुकुल रॉय यांच्या पत्नी कृष्णा सध्या कोरोनामुळे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यांना भेटण्यासाठी सर्वात आधी तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी रुग्णालयामध्ये दाखल झाले. यावेळी बॅनर्जी व रॉय यांच्यात बंद दाराआड 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर बंगालच्या राजकारणात भाजपला लवकरच खिंडार पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

सुवेंदू यांच्यामुळे अस्वस्थता
मुकुल रॉय यांच्यापाठोपाठ तृणमूल सोडून भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांचे प्रस्थ वाढत चालले आहे. त्यामुळेही मुकुल रॉय अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. मुकुल रॉय भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत, मात्र त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा सुभ्रांशू याचा पराभव झाला.

पंतप्रधानांचा मुकुल रॉय यांना फोन
दरम्यान, संभाव्य धोका टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुकुल रॉय यांना फोन करून त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ममता बॅनर्जीच अंतिम निर्णय घेणार
भाजपमध्ये गेलेल्या कुणाला परत तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश द्यायचा याचा अंतिम निर्णय पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जीच घेतील, अशी माहिती तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.