SIR विरोधात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी थोपटले दंड, कोलकात्यात काढणार पदयात्रा

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेची सुरुवात मंगळवार, 4 नोव्हेंबरपासून होणार आहे. त्याच दिवशी बीएलओ (Booth Level Officer) घराघर जाऊन मतदार यादीचे पुनरावलोकन फॉर्म भरून घेतील. मात्र, या दिवशी राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापण्याची शक्यता आहे, कारण तृणमूल काँग्रेसने कोलकात्यात एका भव्य पदयात्रेचे आवाहन केले आहे.

या पदयात्रेचे नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी तसेच पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी करणार आहेत. पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यांतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना मंगळवार दुपारी 1:30 वाजता रेड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पदयात्रा दुपारी 2:30 वाजता सुरू होऊन जोरा संको ठाकुरबाडीपर्यंत जाणार आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी याआधी 2 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात केंद्रीय सभा घेण्याची योजना आखली होती. मात्र, त्याच दिवशी शहीद मीनार मैदानावर दुसरा कार्यक्रम असल्याने ती सभा पुढे ढकलावी लागली. आता तृणमूलने ही रॅली SIR च्या प्रारंभदिनी घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हा दिवस “लोकशाही अधिकार जागरूकता दिवस” म्हणून साजरा करता येईल.

शुक्रवारी अभिषेक बॅनर्जी यांनी सुमारे 18,000 तृणमूल नेते आमि कार्यकर्त्यांसोबत वर्चुअल बैठक घेतली होती, ज्यात त्यांनी SIR दरम्यान पक्षाची रणनीती स्पष्ट केली. त्यांनी निर्देश दिले की बीएलओ जेव्हा घराघर फॉर्म गोळा करायला जातील, तेव्हा पक्षाने नियुक्त केलेले बूथ लेव्हल एजंट-2 (BLA-2) त्यांच्यासोबत राहून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक यांचा संदेश स्पष्ट आहे — “पुढील काही महिने बाकी सर्व विसरून बीएलओसोबत काम करा, जेणेकरून एकही मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही.” तसेच त्यांनी आदेश दिला की प्रत्येक बूथवर 100 टक्के फॉर्म भरून घेण्याचे लक्ष्य पूर्ण झाले पाहिजे.