
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचारसभा आणि रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक 16 एप्रिल रोजी कोलकाता येथे पार पडणार आहे. या बैठकीत निवडणूक आयोग सर्व पक्षांशी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत चर्चा करणार आहे.
बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच पक्षांनी आयोजित केलेल्या निवडणुका रॅलीस प्रचंड गर्दी होत आहे. तसेच, प्रचारादरम्यान कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही. अशा परिस्थितीत कोलकाता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राजकीय कार्यक्रमात कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
उच्च न्यायालयाने निर्देशही जारी केले की, कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य वाटल्यास सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी कलम 144 देखील लागू करावे. न्यायालयाने म्हटले आहे की, बंगालमधील निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांची आहे.





























































