पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताच, ‘बंगाल की बेटी’ जादू करणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वर्षभरापासून कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात पश्चिम बंगालमध्ये ‘बंगाल की बेटी’ म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जादू करणार असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुका जाहीर झालेल्या पाचपैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे ‘लोकसभेची सेमीफायनल’ म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुका केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी अत्यंत महत्त्काच्या आहेत. तामीळनाडू, केरळ या राज्यांत भाजपला फारसा जनाधार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकपूर्व सर्वेक्षणात प.बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होईल. त्याचवेळी भाजपलादेखील मोठी आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तामीळनाडूमध्ये सत्तांतर

तामीळनाडूमध्ये 234 जागासांठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. ओपिनियन पोलनुसार या निवडणुकीत तामीळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डीएमकेला सत्ता मिळू शकते. तर मुख्यमंत्रीपदासाठी डीएमकेच्या स्टॅलिन यांनाच जास्त पसंती मिळताना दिसत आहे. यूपीए (द्रमुक, कॉँग्रेस व इतर) 158 जागा तर एनडीए (अण्णा द्रमुक, भाजप व इतर) 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तृणमूल कॉँग्रेसला सर्वाधिक 156 जागा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक 156, भाजपला 100, काँग्रेस व डाके पक्ष यांना 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना 54.5 टक्के तर भाजपचे दिलीप घोष यांना 24.6 टक्के पसंती दर्शविण्यात आली आहे.

केरळमध्ये सीपीआय सत्ता राखणार

केरळमध्ये विधानसभेच्या 140 जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळकर आपले लक्ष केंद्रित केलेय. पण केरळमध्ये पुन्हा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात सीपीआय सत्ता राखणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या