“सापावर विश्वास ठेवू शकतो, पण भाजपवर नाही”; ममता बॅनर्जींचा जोरदार हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तीव्र टीका करत बंगाली जनतेला तृणमूल काँग्रेसला (TMC) मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे आयोजित निवडणूक सभेत बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत “सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही,” असे वक्तव्य केले. “राज्य सुरक्षित ठेवायचे असेल तर टीएमसीला मतदान करा. संपूर्ण राज्यात टीएमसीची मीच उमेदवार आहे असे समजा,” असे त्या म्हणाल्या.

या वेळी त्यांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप करत देशातील यंत्रणा निष्पक्ष राहिलेल्या नसल्याचा दावा केला. “देशातील कोणतीही यंत्रणा आता तटस्थ नाही. भाजपने सगळ्यांनाच आपल्या ताब्यात घेतले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी आसाम विधानसभा निवडणुकीबाबतही शंका उपस्थित करत भाजपवर बाहेरून मतदार आणल्याचा आरोप केला. “भाजपला स्थानिक मतदारांवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशातून तब्बल 50,000 लोकांना रेल्वेने आसाममध्ये आणले,” असा दावा त्यांनी केला. दरम्यान, 126 सदस्यीय आसाम विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडले.

पश्चिम बंगालमधील मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेवरही त्यांनी टीका केली. “या प्रक्रियेदरम्यान सुमारे 90 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्यापैकी सुमारे 60 लाख हिंदू आणि 30 लाख मुस्लिम मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आसाममधील NRC प्रक्रियेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, तेथे 19 लाख नावे वगळण्यात आली होती, ज्यात 13 लाख हिंदू आणि 6 लाख मुस्लिमांचा समावेश होता.