
यजमान न्यूझीलंडचा क्रिकेट संघ पहिल्या कसोटीत डावाने विजय मिळवण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे. न्यूझीलंडने 7 बाद 519 या धावसंख्येवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव 138 धावांमध्येच गडगडला. त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. वेस्ट इंडीजने तिसऱया दिवसअखेर 6 बाद 196 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 185 धावांनी पिछाडीवर आहे. उद्या कसोटीचा चौथा दिवस असणार आहे.
वेस्ट इंडीजने बिनबाद 49 या धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली, पण त्यांच्या फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही. जॉन कॅम्पबेलने सर्वाधिक 26 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने 35 धावा देत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. काईल जेमीसन व नील वॅगनर यांनी प्रत्येकी 2 तर ट्रेंट बोल्टने 1 फलंदाज बाद केला.
वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना दुसऱया डावातही सूर गवसला नाही. त्यांची अवस्था 6 बाद 89 धावा अशी झाली होती, पण जर्मेन ब्लॅकवूड व अल्जारी जोसेफ या जोडीने सातव्या विकेटसाठी 107 धावांची अभेद्य भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. जर्मेन ब्लॅकवूड 80 धावांवर तर अल्जारी जोसेफ 59 धावांवर खेळत आहे. दुसऱया डावात नील वॅगनरने 2 फलंदाज बाद केले.





























































