लोकल प्रवाशांची ‘कोंडी, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर रखडपट्टी

रेल्वे रूळ देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगरी मार्गांवर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे रविवारी लोकल ट्रेनच्या वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या अवधीत अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे लोकल प्रवासात हाल झाले.

पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. या अवधीत अनेक लोकल ट्रेन दादर आणि वांद्रेहून माघारी फिरवण्यात आल्या. तसेच सर्व जलद गाडय़ा चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरुन वळवण्यात आल्या. दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. यावेळेत अप-डाउन धिम्या मार्गावरील लोकल ट्रेन सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर वळवल्या होत्या. त्याचा संपूर्ण लोकलसेवेवर परिणाम झाला आणि पुटुंबीयांसोबत फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांची रखडपट्टी झाली. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मवर रविवारी दुपारी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. उशिराने धावणाऱया लोकल फेऱयांमुळे प्रवासी स्थानकातच रखडले होते. अनेक प्रवाशांना चार ते पाच गाडय़ा सोडून दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवास करुन घर गाठावे लागले.