पश्चिम रेल्वेवर पुन्हा लोचा; अपघाती मृत्यूमुळे हार्बर ठप्प

aपश्चिम रेल्वेवर बुधवारी लोकल सेवेचा पुन्हा लोचा झाला. तांत्रिक कारणास्तव लोकल ट्रेनचा वेग कमी करण्यात आला. त्याचा परिणाम लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर झाला आणि अप व डाऊन जलद मार्गावरील ट्रेन अर्धा तास उशिराने धावल्या. त्यामुळे कामावर जाणाऱया नोकरदारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.

हार्बर मार्गावर चेंबूर-टिळकनगर स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात 25 वर्षीय तरुणाच्या शरीराचा काही भाग लोकलच्या चाकात अडकला. त्यामुळे ती लोकल बराच वेळ एकाच जागेवर उभी करून ठेवली होती. तेथून लोकल मार्गस्थ झाल्यानंतर लोकलमध्ये तरुणाचे कपडे अडकल्याचे दिसताच लोकल पुन्हा थांबवण्यात आली. या घटनेमुळे ऐन पीक अवर्सला हार्बर रेल्वेची सेवा ठप्प झाली होती.