रेल्वे वर्कशॉपमध्ये प्रेस मशीन धूळ खात, इन्स्टॉल करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये रेल्वे प्रशासनाचा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. वर्कशॉपमधील प्रेस मशीन जुनी झाली आहे. त्यामुळे ती बदलण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी रेल्वेने तब्बल 48 लाख रुपये खर्चून नवी प्रेस मशीन खरेदी केली आहे. मात्र ती इन्स्टॉल करण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने ती धूळ खात पडली असून कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून जुन्याच प्रेस मशीनवर काम करावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोअर परळ वर्कशॉपमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू असून 39 वर्षे जुन्या क्रेनमध्ये बिघाड होऊन चारवेळा जीवघेणे अपघात घडले आहेत. तरीही रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. येथील प्रेस मशीनचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे ती तत्काळ बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने लोअर परळ वर्कशॉपमधील एलएचबी कोचसाठी मोठी प्रेस मशीन 27 मार्च रोजी खरेदी केली असून ती अद्याप उभारली नसून धूळ खात पडली आहे. मशीन नवीन आल्यानंतरही ती उभारण्यासाठी प्रशासनाने अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे येथे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.