
सामना प्रतिनिधी । मुंबई
पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबईसह देशभर हायऍलर्ट असतानाच आता गुजरात राज्यातील सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्थानके, मंदिरे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकावर अतिरेकी हल्ल्याचे सावट असल्याचे पत्र पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने जारी केल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अतिरेकी रेल्वेला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात असल्याने मुंबईच्या लोहमार्ग पोलीस आयुक्तांना सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणारी बैठक घेऊन सर्वांना डोळ्यांत तेल घालून पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे महानिरीक्षक सह प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या नावाने एक धक्कादायक पत्र व्हॉटस्ऍपवर व्हायरल झाले असून त्यात पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर इतिहासातील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करण्याच्या बेतात दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गुजरातसह मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानके, घाटकोपर-वर्सोवा मार्गावरील मेट्रोची स्थानके आणि बसस्थानकांवर हायऍलर्ट जारी करण्यात आला आहे.
हैदराबादचे सुसाइड बॉम्बर हल्ल्याच्या बेतात
पुलवामा हल्ल्यातील एक अतिरेकी हैदराबादचा रहिवासी मोहम्मद इब्राहिम तसेच अन्य एक सुसाइड बॉम्बर रेहान त्याच्या सोबत वृद्ध महिला अतिरेकी यांचा निशाना रेल्वेची स्थानके असून हे लोक आंतरराष्ट्रीय दहशतवादी मौलाना मसूद अजहरचे साथीदार आहेत. त्यामुळे हायऍलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवरून
येणार्या-जाणार्या गाड्यांना विशेषकरून जम्मू-कश्मीरवरून येणार्या ट्रेन तसेच रेल्वे परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकार्यांसोबत संयुक्त बैठक
यासंदर्भात लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना विचारले असता त्यांनी रेल्वे अधिकारी आणि पोलीस अधिकार्यांसोबत गुरुवारीच संयुक्त बैठक घेतल्याचे सांगितले. सर्व सार्वजनिक ठिकाणांवर हल्ल्यानंतर सिक्युरिटी टाइट करण्यात आली असून बैठकीत सध्याच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येऊन सुरक्षा आणखी कशी मजबूत होईल याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.



























































