‘परे’च्या लोअर परळ कारखान्यात डासांच्या अळ्या, मलेरियाच्या भीतीने कामगारांची उडाली गाळण

518

एकीकडे रेल्वेचे कर्मचारी कोरोनाचा सामना करत असताना पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ बोगी कारखान्यात डासांच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अळ्यांची तपासणी करण्यासाठी पालिका अधिकार्‍याकडे तक्रार करण्यात आली आहे.

रेल्वेच्या कारखान्यांत शंभर टक्के उपस्थिती राखण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा लोअर परळ कारखानाही यास अपवाद नसल्याने येथेही कामकाज चालू झाले आहे. यात डब्यांची डागडुजी वगैरे कामे सुरू असताना पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली असून त्यात डासांची अंडी कर्मचार्‍यांना सापडली आहेत. त्यामुळे कामगारवर्ग संतप्त झाला आहे. आधीच लोअरपरळ कारखाना कोरोना संसर्गाच्या ‘रेड झोन’ परिसरात मोडत असल्याने कामगारांना कोरोनाची भीती असताना आता डेंग्यू व मेलेरियाचीही दहशत कामगारांना सहन करावी लागत आहेत.

सन 1867 मध्ये स्थापन झालेल्या पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कॅरेज रिपेअर वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक एलएचबी कोचेसची देखभाल आणि दुरूस्ती केली जाते. लॉकडाऊन शिथील करताना 12 मेपासून देशभरात वातानुकूलित गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यानंतर 1 जूनपासून वेळापत्रकावर आधारित 200 वातानुकूलित आणि विना वातानुकूलित गाड्यांच्या फेर्‍या सुरू झालेल्या आहेत. आता जुलैमध्ये उद्योगधंदे आणि सरकारी कार्यालये सुरू झाल्याने उत्तरेकडील राज्यांतील मजूरांची मुंबईत येण्याची घाई सुरू झाली आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे.

प्रोडक्शन युनिट चालविणे रेल्वेची मजबूरी
लॉकडाऊन शिथील करण्यात येत असल्याने गाड्यांची वाढती मागणी आहे. या पार्श्वभूमीवर गाड्यांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी रेल्वेने आपल्या सर्व वर्कशॉप्सच्या कामगारांना शंभर टक्के उपस्थिती लावण्याचे आदेश दिले आहेत. कारखाने हे प्रोडक्डन युनिट असल्याने त्यांना कामगार उपस्थितीचे आदेश लावू शकत नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या