
लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. यातून अधूनमधून टीसींवर हल्ले होत आहेत. याला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढील 20 ते 25 दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर 20 बॉडी कॅमेरे खरेदी करून ते टीसींना देणार आहे. टीसींच्या स्पेशल जॅकेटमध्ये बॉडी कॅमेरे लावले जाणार आहेत. त्याआधारे तिकीट तपासणीच्या कारवाईचे ‘फुटेज’ मिळवून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपनगरी रेल्वे मार्गावर टीसींना मारहाण करण्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. गर्दीत हे प्रकार घडतात. अशा घटनांतील प्रवासी आणि टीसी या दोघांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या ‘नमस्ते’ अभियानांतर्गत बॉडी कॅमेऱ्यांची खरेदी केली जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर 20 बॉडी कॅमेरे आणि काळ्या रंगांची 30 स्पेशल जॅकेट खरेदी केली जाणार आहेत. पुढील 20 ते 25 दिवसांत बॉडी कॅमेरे, तर 30 दिवसांत स्पेशल जॅकेट उपलब्ध होतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बॉडी कॅमेऱ्यात साधारण चार ते पाच फुटांपर्यंतचे चित्र आणि आवाज रेकॉर्ड होणार आहे. तिकीट तपासणीच्या कारवाईवेळी टीसी प्रवाशांसोबत कशा प्रकारे वागत आहे? कारवाईला सामोरे जाताना प्रवासी कोणत्या पद्धतीने उत्तरे देत आहेत? प्रवाशांच्या हालचाली कशा आहेत? टीसींमार्फत बेकायदेशीररीत्या पैसे मागण्याचा प्रयत्न होतोय का? आदी सर्व गोष्टींवर बॉडी कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पाळत ठेवली जाणार आहे.
वाद झाल्यास नेमकी चूक कोणाची ते कळणार!
टीसीशी हुज्जत आणि वाद घालण्याचे प्रकार सर्रास घडतात. बॉडी कॅमेऱ्यांमुळे अशा वादाच्या प्रकारांमध्ये नेमकी चूक कोणाची आहे, याचा सहज उलगडा होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर खरेदी केलेल्या 20 बॉडी कॅमेऱ्यांची व्यवहार्यता तपासून आणखी कॅमेऱ्यांची खरेदी केली जाईल, सध्या संवेदनशील ठिकाणांवर या कॅमेऱ्यांचा वापर केला जाईल, नजीकच्या काळात बहुतांश टीसींना बॉडी कॅमेरे आणि स्पेशल जॅकेट दिले जातील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.