बळीपुत्रांचे आक्रंदन

>> डॉ. नागेश टेकाळे

वेदनेतून आक्रंदन निर्माण होते आणि त्यातून निर्मिती होते ती शोकांतिकेची. आज महाराष्ट्रामधील शेतकरी या तीन टप्प्यांमधून जात आहे. पाऊस म्हणजे आनंद. मग आज हा आनंद दुःखामध्ये का रूपांतरित झाला आहे? या प्रश्नाची उकल आपणा सर्वांनाच करायची आहे. ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नसून याही परिस्थितीत निसर्गास बरोबर घेऊन शाश्वत शेतीच्या पायऱया रचण्याची आहे. फरक एवढाच की, या पायऱयांचे दगड शासन, कर्मचारी, शास्त्र्ाज्ञ आणि शेतकरी यांनी घेऊन घडवायचे आहेत. राष्ट्र पुढे येते ते अनुदानाने नव्हे, तर प्रत्येक घटकाच्या योगदानाने. हे समजून घेतले तर उद्या बळीपुत्रांना आक्रंदन करण्याची वेळ येणार नाही.

‘अस्मानी-सुलतानी’ या दोन जोडशब्दांचा प्रयोग आपल्याकडे मोगल राजवटीपासून प्रचारात आहे. आकाशामधून पडणारा प्रखर सूर्यप्रकाश, काळेकुट्ट ढग, ढगफुटी, मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना आलेले महापूर, चक्रीवादळे आणि या नैसर्गिक संकटामुळे होत्याचे नव्हते होऊन जाणे म्हणजे अस्मानी संकट. ‘सुलतानी’ हा शब्द ‘अधिकारपदी असलेल्याने सर्वसामान्यांची केलेली लुटालूट’ या दृष्टिकोनातून वापरला जातो. पूर्वी मोगल काळात सुलतानांच्या फौजा आक्रमण करताना शेतकऱयांची शेती, धान्य कोठारे उद्ध्वस्त करून खंडणी गोळा करत. हतबल प्रजा कुणाकडे गाऱहाणे करणार? अशी ही परिस्थिती व तिचे दाखले आजही आपणांस इतिहासात पाहावयास मिळतात. शेती आणि ती कसणारा शेतकरी यांस हे दोन शब्द चपखलपणे लागू पडतात. इतिहास असेही सांगतो की, अस्मानीपेक्षाही सुलतानी संकटामुळे त्यावेळची बळीराजाची प्रजा ग्रासलेली होती. मात्र छत्रपती शिवरायांचे सुराज्य आले आणि शेतकऱयांना खऱया अर्थाने सन्मान मिळू लागला.

चारपाच दशकांपूर्वीचा काळ हा हिंदुस्थानी शेतीचे तसे सुवर्णयुगच. ऋतुबदल निसर्ग नियमानुसार होत असत. खरीप, रब्बीमध्ये त्या काळी शेतात फुलणारी कितीतरी पारंपरिक पिके होती. शेतांचे रुंद बांध, खळखळ वाहणाऱया नद्या, तुडुंब भरलेल्या विहिरी आणि सोबत 60 टक्क्यांपेक्षाही जास्त जंगल. मग पाऊस नियमित आणि तोही संयमात का नाही पडणार! साठ-सत्तरच्या दशकामधील हरित क्रांतीने हिंदुस्थानी शेतीचा चेहरामोहराच बदलला. मेक्सिकन गव्हाने आपल्या शेतीत प्रवेश केला आणि ताटामधील ज्वारी-बाजरीची भाकरी हद्दपार झाली. पूर्वी आमचा शेतकरी भाजीभाकरी, चटणी, चवीला कांदा, मुळा यांचे जेवण बांधावरच्या वृक्षाच्या छायेत घेत असे. त्याचे पशुधनही बांधावरचाच चारा खात असे. आज हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. ‘इंच इंच लढवू’ ऐकून उसळणारे रक्त आज ‘इंच इंच पेरू’जवळ थांबलेले आहे. आज शेताला ना बांध ना वृक्षराजी. पूर्वी पशुधन आणि वृक्षसंख्या ही शेतकऱयाची खरी श्रीमंती होती. आज यातले काय शिल्लक आहे? कापूस, सोयाबीन आणि इतर नगदी पिकापोटी आम्ही शेतीला वैयक्तिक आर्थिक विकासासाठी जुंपले. भरमसाट रासायनिक खते वापरून जमिनीचे वाळवंट केले. शेतामधील जैविक माती पिकाला आधार देते, मुळे जमिनीत खोलवर जातात आणि पीक ताठ उभे राहते.

रासायनिक खताच्या अनियंत्रित वापरामुळे शेतजमिनीमधील जैव विविधता लयाला गेली. तयार अन्न भूपृष्ठावरच उपलब्ध होऊ लागल्यामुळे मुळांना जमिनीत खोलवर जाण्याची गरजच उरली नाही. म्हणूनच अल्प, पण जोरदार पावसातही पिके जमिनीवर लोळण घेऊ लागली. दोष वाणांचा नसून कसणाऱयांचा आहे.

या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला. त्याचे उशिरा येणे बळीपुत्रांसाठी सुरुवातीस खूपच काळजीचे होते. मराठवाडय़ात तर ऑगस्टपर्यंत शोकाकूल वातावरण होते आणि नंतर तो बरसू लागला, थांबायचे नावच नाही. नद्यांना महापूर, मृत धरणे ओसंडून वाहू लागली, जलाशये भरली. शेतकरी पाण्याने तृप्त झाला, पण समोरचे भरलेले ताट रिकामे होतच नव्हते. आज या अस्मानी संकटापुढे बळीपुत्र हतबल आहे. शेतामधील हातातोंडाशी आलेला घास धो-धो पावसात वाहून गेला. पांरपरिक पिके आणि सेंद्रिय शेतीला तिलांजली दिलेले शेतकरी आज नगदी पिके आणि हमीभावाच्या धारदार कात्रीमध्ये अडकलेले आहेत. एकूणच खरिपाचे चित्र विदारक आहे. त्यात रब्बीचे रंग भरण्यासाठी शासनाकडून मदत हवी आहे. पाऊस जवळपास थांबला आहे. बळीपुत्र शासकीय  मदतीने पुन्हा उभा राहील.

अशा अस्मानी संकटाला यापुढेही आपणांस नियमित सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरण आणि निसर्गाचा आम्ही एवढा नाश केला आहे की, काळजी घेऊनही पुढील 20-25 वर्षे तरी ही धोक्याची घंटा वाजतच राहणार. आपण फक्त तीव्रता कमी करू शकतो. बांधावर वृक्षलागवड,  परिसरामधील डोंगर वृक्षराजीने सजविणे, नदीची आईप्रमाणे सेवा करून तिच्या काठावरची आक्रमणे दूर करणे, शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून रासायनिक खते औषधाप्रमाणे वापरणे आणि नगदी पिकाबरोबरच पांरपरिक पिकांना खरीप आणि रब्बीमध्ये सन्मानाचे स्थान दिल्यास वातावरण बदलाच्या ठोक्याची तीव्रता निश्चितपणे कमी होऊ शकते.

शेती ही स्थानिक भौगोलिक परिस्थितीप्रमाणेच असावयास हवी याचा आम्हाला विसर पडला आहे. स्थानिक पिके वातावरण बदलास सक्षमपणे तोंड देऊ शकतात, पण आज असे घडत नाही. अमेरिका, अर्जेंटिना, कॅनडामध्ये शेतकऱयाने त्याच्या शेकडो हेक्टरवर लावलेले सोयाबीनसारखे विदेशी पीक आमचे अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या दोनतीन एकरवरही पेरतात. तिकडचे शेतकरी त्यांच्या सोयाबीन पेरीमध्ये 25 टक्के नुकसान गृहित धरूनही याच पिकावर मालामाल होतात. आम्ही अस्मानी नुकसान गृहीत न धरता केलेली सोयाबीनची पेरणी अशा संकटप्रसंगी शेतकऱयांना उद्ध्वस्त करून टाकते. मला अजूनही वाटते की, शासनाने या सर्व उद्ध्वस्त अल्पभूधारकांना स्थानिक पारंपरिक पिकाचा पर्याय देऊन सोयाबीनपेक्षाही जास्त हमीभाव देऊन  शाश्वत सेंद्रिय शेतीकडे वळवावे.

या वर्षी द्राक्षपिकाचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. वास्तविक पावसापेक्षाही गारपीट ही या पिकाची नंबर एक शत्रू. फ्रान्समध्ये द्राक्ष पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पूर्वी गारपिटीने तेथील द्राक्षपिकाचे मोठे नुकसानही होत असे. गेल्या एक दशकात वातावरण बदलामुळे फ्रान्समध्ये गारपीट वाढतच आहे. मात्र द्राक्षपीक त्यात सुरक्षित आहे. कारण त्यास तेथील शेतकऱयांच्या काही मुलांनी एकत्र येऊन द्राक्षपिकासाठी तयार केलेले नावीन्यपूर्ण आच्छादन. हवामान खात्याकडून गारपिटीचा अंदाज व्यक्त होताच जेमतेम 10-15 मिनिटांत सर्व द्राक्षक्षेत्र वरच्या टोकाला यांत्रिक पद्धतीने आच्छादून तयार होते. आज आपल्या शेतकऱयांना निसर्ग संकटात त्यांच्या कृषी उत्पादनासाठी अशा पद्धतीच्या आच्छादनाची गरज आहे. यावर्षीच्या पावसात शेतातील उभ्या पिकापेक्षा काढून साठविलेले पीकच जास्त नष्ट झाले आहे. अनुभवातून आपण शिकावयास हवे. या वर्षीच्या लांबलेल्या पावसाळ्यास सुलतानी संकटाशी जोडता कामा नये. आज शासन शेतकऱयाच्या बांधावर मदतीचा हात पुढे करून उभा आहे. त्यास विश्वासाने पकडणे गरजेचे आहे. सरकार येते, जाते. योजना राबविणारे हे शासकीय अधिकारी व कर्मचारीच असतात. निसर्गाने केलेल्या नुकसानीचा राग त्यांच्यावर अथवा शासनावर काढणे म्हणजेच ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ असे काहीतरी होते. शासन आणि शेतकरी यांच्यामधील जोडलेला बळकट धागा म्हणजे योजना राबवणारा कर्मचारी. या तिघांनी एकत्र येऊन आलेल्या संकटावर मात करणे ही काळाची गरज आहे.

शेती आजही आपल्याकडे व्यवसाय समजला जात नाही. म्हणूनच हे क्षेत्र आपत्ती व्यवस्थापनापासून फार दूर आहे. अकस्मात येणारा अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळे, ढगफुटी यापासून उभे पीक तसेच काढणीपश्चात त्यांचे रक्षण कसे करावे यासाठी शासन, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे यांच्यातर्फे नियमितपणे मॉक ड्रिल यांसारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. पीक विमा हे यासाठी खात्रीचे औषध मुळीच नव्हे. 117 वर्षांनंतर एकाच वर्षात चार चक्रीवादळे आणि त्यासोबत आलेला मुसळधार पाऊस आणि त्यास जोडलेला ओला दुष्काळ आज आम्ही अनुभवत आहोत. यानंतरच्या काळातही ही संख्या वाढण्याची शंका जास्त आहे, एवढा वातावरण बदल झाला आहे. अनुभव हाच खरा शिक्षक. या शिक्षकाच्या छडीची ‘छमछम’ आम्हाला विद्येची घमघम देणार नाहीच, उलट शाळा सोडण्यासाठी प्रवृत्त करील. म्हणूनच या निसर्गशाळेचा सन्मान करून येणारा प्रत्येक दिवस निसर्गदिन म्हणून साजरा करणे हेच शेतकऱयांच्या हिताचे आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या