
जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी निधन झालं असून, आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची मोठी ख्याती होती. मुख्य म्हणजे जयंत नारळीकरांची ओळख ही मराठी विज्ञानकथा लिहीण्यासाठी प्रचलित होती. साध्या सोप्या भाषेमध्ये विज्ञानाची भाषा नारळीकरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. जयंत नारळीकरांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर त्यांनी हिंदुस्थानात परतून, टाटा मुलभूत संशोधन संस्थेत काम केले होते. नाशिकमध्ये 2021 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आज (मंगळवार 20 मे) पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंत नारळीकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. यामध्ये 1965 मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2004 मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने जयंत नारळीकर यांना गौरवण्यात आले होते. स्मिथ पुरस्कार (1962), पद्मभूषण (1965), ॲडम्स पुरस्कार (1967), शांतीस्वरूप पुरस्कार (1979), इंदिरा गांधी पुरस्कार (1990), कलिंग पुरस्कार (1996) आणि पद्मविभूषण (2004), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2010) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
जयंत नारळीकर यांना 2014 साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-2013 देखील मिळाला होता. याबरोबरीने यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा 2014 सालचा पुरस्कार मिळाला होता. नारळीकरांनी लिहिलेल्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला होता.