
केक बनवण्यासाठी किंवा बेकरी उत्पादनांसाठी हटकून वापरले जाणारे दोन पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. पण, या दोन्ही पदार्थांच्या मापांमध्ये फरक असतो. पांढुरक्या रंगाच्या भुकटीसारखे दिसणारे हे दोन्ही पदार्थ एकमेकांसारखे दिसत असले, तरी त्यांची निर्मिती, गुणधर्म हे मात्र वेगळे असतात. कोरा या प्रश्नोत्तरांच्या संकेतस्थळावर यासंबंधी उत्तर देण्यात आलं आहे.
या दोन्ही पदार्थांचा बेकरी उत्पादनांमध्ये फार महत्वाचा वाटा आहे. हे दोन्ही पदार्थ बेकरी उत्पादनांमध्ये Leavening agent म्हणून काम करतात. मग , leavening agent म्हणजे काय? असा पदार्थ ज्यामुळे फोमिंग क्रिया, म्हणजेच हवा भरलेले बुडबुडे अन्नात तयार होतात ज्यामुळे मिश्रण हलके आणि मऊ होते. हे leavening agent शक्यतो पिठात, कणकेत वापरले जातात.
जेव्हा आपण इडलीच्या पिठात सोडा घालून त्याला काही तास ठेवतो तेव्हा त्यात असणाऱ्या सोड्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो , ज्यामुळे ते पीठ फुगते. फार पूर्वीपासून , जेव्हा माणसाला आंबवणे आणि त्यामागचे शास्त्र माहित नव्हते तेव्हापासून leavening agent म्हणून निसर्गतः मुक्तपणे उपलब्ध असणारी बुरशी – जिला आज आपण बेकर्स यीस्ट या नावाने ओळखतो हीच अन्नात वापरली जात असे.
याशिवाय हवा हासुद्धा leavening agent म्हणून वापरला जाणारा मोठा घटक आहे. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी पिठाला जोरजोरात फेटून त्याला मउसूत करून हलके केले जात असे, जसं आज आपण केकवरील क्रीम फेटतो तसाच हा प्रकार.
बेकिंग सोडा –
बेकिंग सोडा शोधण्याचे श्रेय जाते ते व्हॅलेंटीन रोज या माणसाला. ते एक जर्मन फार्माकोलॉजिस्ट होते. यांनी बेकिंग सोड्याबरोबरच इनुलीन या पदार्थाचासुद्धा शोध लावला. 1846 मध्ये, जॉन ड्वाइट आणि ऑस्टिन चर्च या दोन अमेरिकन बेकर्सनी सोडियम कार्बोनेट आणि कार्बन डायऑक्साइडपासून बेकिंग सोडा तयार करण्यासाठी अमेरिकेत पहिला कारखाना स्थापन केला.
बेकिंग पावडर –
सोड्यापासूनच बेकिंग पावडर सुद्धा तयार होते. यालासुद्धा जवळपास सोड्याप्रमाणेच मोठा इतिहास आहे. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी रसायने वापरून आपापल्यापरीने नवीन उत्पादन शोधण्याचा प्रयत्न केला होता.
बेकिंग सोडा म्हणजे रासायनिक भाषेत NaHCO3. धुण्याचा सोडा, पाण्यात विरघळवला जातो आणि कार्बन डायऑक्साइडने त्यावर अभिक्रिया केली जाते. या द्रावणातून सोडियम बायकार्बोनेट घनरूप बनते आणि तळाशी जमा होते. बेकिंग पावडर हा मुख्यतः फक्त बेकिंग सोडा असतो जो अॅसिडमध्ये मिसळलेला असतो. म्हणजेच बेकिंग सोडा आणि फॉस्फेट/ सोडियम अल्युमिनियम सल्फेट/ टार्टरेट यापैकी एक किंवा अधिक अॅसिड होय.




























































