
अमित घोडेकर,[email protected]
सोशल नेटवर्किंगला सध्या एका मोठय़ा भूताने पछाडले आहे… ते म्हणजे ट्रोलिंग… म्हणजेच एकदम सोप्या शब्दांत कोणत्याही गोष्टीला नाव ठेवणे किंवा काहीही बोलणे….
आपल्याकडे एक म्हण आहे ‘कुणाचं काय आणि कुणाचं काय’. म्हणजेच कुणाच्या मनात काय चाललं आहे हे कुणीच सांगू शकत नाही. दासबोधात तर म्हटले आहे की, मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेतात वासना. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील एका नागरिकाने खूप रात्री ट्विटरवर एक ट्विट केले. आज काहीतरी विचित्र वाटतंय. घरासमोर खूप लाईट दिसत आहेत. अचानक एवढे हेलिकॉप्टर का आले असावे? काही वेळाने त्याने पुन्हा एक ट्विट केले, एवढय़ा बंदुकीच्या गोळय़ा कुणावर झाडत असतील? आणि मग थोडय़ा वेळाने परत एक ट्विट सगळं काही शांत झालंय.
दुसऱया दिवशी अमेरिकेने जाहीर केले की त्यांनी अमेरिकेत जाऊन जगातील सगळय़ात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा पाकिस्तानमध्ये जाऊन केला. मग कुणीतरी त्या पाकिस्तानमधल्या माणसाचं ते ट्विट बघितलं आणि सगळय़ांना शेयर केलं. या एका घटनेमुळे सोशल नेटवर्किंग काय मोठी गोष्ट आहे हे जगाला कळाले. पुढे मग सोशल नेटवर्किंगचा वापर खूप मोठय़ा प्रमाणात वाढू लागला. त्यात आघाडीवर होते ते सगळेच अगदी मोठमोठे कलाकार, खेळाडू, राजकीय नेते, मोठमोठय़ा कंपन्या तुम्ही आम्ही सगळेच. सोशल नेटवर्किंग कोणत्याही घटनेवर आपल्या भावना व्यक्त करण्याचे एक खूप मोठे माध्यम बनले. मग कमी शब्दांत भावना व्यक्त करायच्या असतील तर ट्विटर नाहीतर फेसबुक. जर फोटो शेयर करायचे असतील तर इंस्टाग्राम इ.
पण याच सोशल नेटवर्किंगला सध्या एका मोठय़ा भुताने पछाडले आहे ते म्हणजे ट्रोलिंग, म्हणजेच एकदम सोप्या शब्दांत कोणत्याही गोष्टीला नाव ठेवणे किंवा काहीही बोलणे, कधी कधी ते बरोबर असू शकते पण बऱयाचदा ते चूकच असते. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठल्यातरी दौऱयावर केले होते तेथे राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नीचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या पत्नीने तो चक्क घेतलाच नाही. हे सगळय़ांनी टीव्हीवर बघितले. मग कुठल्यातरी महाभागाने हे अगोदरदेखील एकदा झाले होते याचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर टाकला आणि काही वेळातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रोल होऊ लागले. काही लोक म्हणू लागले की याच्या पत्नीचे यांच्यावर प्रेम नाही मग देश कसा करेल? अशाप्रकारचे काहीही मेसेजेस लोक टाकू लागले आणि साक्षात जगातील सगळय़ात शक्तिशाली व्यक्ती जगातील सगळय़ात मोठा विनोद झाला.
आजकाल अशाप्रकारे अनेक सेलिब्रेटींना कोणत्याही गोष्टीसाठी ट्रोल केले जाते. कधी त्यांचे कपडे, कधी त्यांचे फोटो, कधी त्यांचे विचार, अगदी काहीही. अनेकजण त्याचा चांगलाच समाचार घेतात पण बरेचजण मात्र याचा बकरा बनतात. ट्रोलिंगचा वापर आजकाल अनेक कंपन्या आपले विचार पोहचवायासाठी करू लागल्या आहेत म्हणजेच एखादे उत्पादन कसे खराब आहे हे लोकांच्या मनात बिंबवले जाते आणि मग आपली गोष्ट कशी चांगली आहे हे पटवले जाते त्यासाठी लाखो ट्रॉलर्सची मदत घेतली जाते. एकंदरीत काय तर, ट्रोलिंगचं भूत होत्याचं नव्हतं करून टाकते.

























































