जरा सावध राहा

268

>> अमित घोडेकर

व्हॉट्सऍप सगळय़ात सोपे संदेश वाहक. त्याच्या या सोप्या वापरामुळे अनेक चूकीच्या गोष्टींनाही थारा मिळाला आहे.

गेल्या वर्षभरात सगळय़ात जास्त चर्चेत कोण असेल तर तर ते व्हॉट्सऍप आणि फेसबुक. या दोन्ही ऍप्स अतिशय चांगल्या आणि अतिशय वाईट अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत आहेत. अनेक चांगले नवनवीन फीचर्स आणल्यामुळे लोक खूश आहेत; पण व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून वाढलेली गुन्हेगारी आणि लोकांचा डेटाचोरीच्या प्रकरणातून व्हॉट्सऍप आणि फेसबुकची मुक्तता व्हायचं काही नाव घेत नाहीये. गेल्या   आठवडय़ात व्हॉट्सऍपच्या डेटाचोरीचं आणखीन एक मोठं प्रकरण बाहेर आले आहे आणि ते खूप खळबळजनक आहे.

अमेरिकेत गेल्या वेळेस झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अचानकपणे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले आणि राष्ट्राध्यक्षदेखील झाले, खरं तर त्यावेळेस हिलरी क्लिंटन या निवडून येणार आणि राष्ट्राध्यक्ष होणार असाच सगळय़ांचा कयास होता; पण अचानक निवडणुकीत  काहीतरी चमत्कार झाला आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. सगळं जग या धक्क्यातून सावरायच्या आत अचानक अमेरिकन निवडणुकीत रशियन घुसखोरीच्या बातम्या येऊ लागल्या आणि लोकांना कळून चुकलं की, निवडणुकीत काहीतरी काळंबेर झालं आहे. मग काही दिवसांनंतर अचानक संशयाची सुई फेसबुकवर वळली आणि काही दिवसांतच फेसबुकने अमेरिकन निवडणुकीत अजाणतेपणी लुडबुड केल्याचे सिद्ध झाले. फेसबुकने युरोपमधील केम्ब्रिज अनलिटीका नावाच्या कंपनीला फेसबुक वापरणाऱया सगळय़ा लोकांचा डेटा वापरायला दिला. या माहितीचा वापर करून केम्ब्रिजने लोकांच्या राजकीय आणि सामाजिक माहितीचा अभ्यास करून पद्धतशीरपणे त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिल्यास कसा फायदा होऊ शकतो हे ठसवून दिले आणि जगात पहिल्यांदा सोशल नेटवार्ंकगवरून एक निवडणूक पूर्णपणे फिरली आणि जगाच्या इतिहासात एक अनपेक्षित निकाल लागला.

असंच काहीसं गेल्या आठवडय़ात व्हॉट्सऍपबद्दलच्या बाहेर आलेल्या माहितीमुळे झाले आहे. या माहितीमुळे हिंदुस्थानात मोठी खळबळ माजली आहे आणि ती बातमीच अशी खळबळजनक आहे. ती बातमी म्हणजे, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कित्येक महिने हिंदुस्थानातील अनेक मोठमोठय़ा विरोधी राजकीय पक्षाच्या व्यक्तींच्या व्हॉट्सऍपमध्ये गुप्तहेरी केली गेली. गेल्या आठवडय़ात व्हॉट्सऍपने एका इस्रायली स्पायवेयर पेगसूसवर अमेरिकेत एक गुन्हा दाखल केला. या तक्रारीत असे नमूद केले आहे की, पेगसुस नावाच्या या इस्रायली स्पायवेयरने जगभरातील तब्बल 1400 लोकांच्या मोबाईलमधून मोठय़ा प्रमाणात माहितीची चोरी केली आणि त्या माहितीचा गैरवापर केला गेला.

ही बातमी बाहेर आली आणि हिंदुस्थानात एकाच खळबळ माजली आहे त्याचे कारण म्हणजे, या 1400 लोकांत बहुतांशी लोक हिंदुस्थानातील मोठय़ा राजकीय  पक्षाचे नेते आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच समाजातील अनेक नामवंत व्यक्ती आहेत. यात आणखीन खळबळजनक गोष्ट म्हणजे ही, गुप्तहेरी झाली ती वेळ ही सगळी माहिती चोरली गेली. ती चक्क हिंदुस्थानातील लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात म्हणजे मे 2019च्या आजूबाजूला. या नामवंत व्यक्तींच्या मोबाईलमध्ये पेगसूस नावाचा हा स्पायवेयर सोडण्यात आला. गुप्तहेर जसे एखाद्या राष्ट्रात घुसून चतुराईने माहितीची चोरी करतात तसाच ह्या पेगसूस स्पायवेयरने ह्या नामांकित व्यक्तींच्या मोबाईलवरची सगळी माहिती व्हॉट्सऍपमधील संभाषण दूरध्वनी रेकॉर्ड, फोटो अशी प्रचंड माहिती एका अज्ञात स्थळी पाठवली.

या सगळय़ा हेरगिरीत प्रियांका गांधी ह्यांचा मोबाईलवरील व्हॉट्सऍपमधील मेसेजेस् हॅक झाले आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. या सगळ्यामुळे व्हॉट्सऍपच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या वेळेस मात्र एक गेष्ट व्हॉट्सऍपने केली की, ती म्हणजे व्हॉट्सऍपने अशा प्रकारच्या घुसखोरीची कल्पना दिली होती आणि त्यांनी ह्याची कायदेशीर तक्रारदेखील केली. त्यामुळे व्हॉट्सऍपवरचा विश्वास अजूनतरी अबाधित आहे पण एकंदरीत मोठमोठय़ा राजकीय पक्षांच्या लोकांवर घुसखोरी झाल्यामुळे व्हॉट्सऍपच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता बघुयात की, पुढच्या काही दिवसांत पेगसूस नावाच्या ह्या स्पायवेयरमुळे काय काय राजकीय आणि सामाजिक धुमाकूळ माजते ते.

आपली प्रतिक्रिया द्या