
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जगभरामध्ये व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेसेज, व्हिडीओ, फोटोंची देवाण-घेवाण आणि चॅटिंगसाठी व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. व्हॉट्सअॅपही काळानुसार आपल्या युझर्सला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्नात असते. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये असणाऱ्या एका महत्त्वाच्या फिचरमध्ये बदल करण्यात आला आहे. कंपनीने डिलिट फॉर एव्हरीवन या फिचरची वेळ मर्यादा वाढवली आहे. या फिचरमुळे चुकून एखाद्या व्यक्तीला पाठवण्यात आलेला मेसेज डिलीट केला जातो.
WABeta ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या डिलिट फॉर एव्हरीवन या फिचरमध्ये बदल करून त्याची वेळ मर्यादा वाढवली आहे. आता मेसेज डिलीट करण्यासाठी 13 तास 8 मिनिट आणि 16 सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. याचा अर्थ युझर 13 तासानंतरही मेसेज डिलीट करू शकणार आहे. याआधी मेसेज डिलीट करण्याची वेळ 1 तास 8 मिनिटं होती. त्यापूर्वी ही मर्यादा फक्त 7 मिनिटं होती. परंतु युझर्सच्या मागणीप्रमाणे त्यामध्ये बदल केला गेला आहे.
फेसबुक आणतेय अनसेंड फिचर
दरम्यान, फेसबुक मेसेंजरही मेसेज अनसेंड फिचर आणण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. सध्या याची चाचणी सुरू आहे. तसेच हे फिचर कधीपर्यंत येईल याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.





























































