मित्रमैत्रिणींच्या गप्पांचा फड रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

व्हॉट्सऍपवर आजपासून ऑडिओ, व्हिडिओ ग्रुप कॉलिंगची सुविधा सुरू झाली आहे. ऍन्ड्राईड आणि आयओएस प्रणालीवरील मोबाईलवर ही सेवा सुरू झाली असून आता मित्रमैत्रिणींच्या गप्पांचा फड आणखी रंगणार आहे. ही ग्रुप ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग सेवा इतर ऑडिओ-व्हिडिओ व संदेशांप्रमाणेच ‘इनस्क्रिपटेड’ असेल. त्यामुळे माहिती लिक होण्याचा धोका नाही. व्हॉट्सऍपने जगभरातील ग्राहकांसाठी २०१६ मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सेवा सुरू केली होती. त्यानंतर ग्रुप ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची लोक वाट पाहत होते.

‘चौकडी’चा ग्रुप

चार जणांसाठी ही सुविधा आहे. नव्या सुविधेत कॉल करणाऱयांसह त्याचे तीन मित्र किंवा मैत्रीण यात सहभागी होऊ शकतील. चौथा मित्र कॉलिंगमध्ये आला की, ‘ऍड पार्टिसिपन्ट’ हा आयकॉन आपोआप गायब होईल.

ग्रुप कॉल कसा करावा?

नेहमीच्या पद्धतीने कॉल करावा. फोन लागला की, वर उजवीकडे ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल सिलेक्ट करायचा. तिथे असलेल्या ‘ऍड पार्टिसिपन्ट’वर जाऊन मित्र किंवा मैत्रिणीला ऍड करता येऊ शकते.

कॉलची वैशिष्टय़े

ग्रुप व्हिडिओ कॉल सुरू असताना कॉलिंगमधील कोणीही व्यक्ती एकमेकांना व्हिडिओ पाठवू शकते. ग्रुपमधील ऑडिओ कॉल असताना सगळय़ांचे फोटो फोनवर दिसतील. त्याचबरोबर त्यांची नावेही मोबाईल स्क्रीनवर दिसतील.