
व्हॉटस्अॅपने आता पेमेंट सेवाही सुरू केली आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) गुरुवारी सायंकाळी व्हॉटस्अॅपला यूपीआय बेस्ड पेमेंट सेवेसाठी मंजुरी दिली. 10 प्रादेशिक भाषांतील व्हॉटस्अॅप व्हर्जनमध्ये ही सेवा उपलब्ध असणार आहे. यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मेसेजप्रमाणेच एका क्लिकवर पैसे पाठवणे शक्य होईल, असे कंपनीतर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आले.
फेसबुकची उपकंपनी असलेल्या व्हॉटस्अॅपचे हिंदुस्थानात तब्बल 40 कोटींहून अधिक युजर्स आहेत. कंपनी मागील दोन वर्षांपासून पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी एनपीसीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत होती. याच अवधीत जवळपास 10 लाख युजर्ससाठी सेवा सुरू करण्याची चाचणी करण्यात आली. अखेर गुरुवारी एनपीसीआयची मंजुरी मिळताच व्हॉटस्अॅपने या बहुप्रतिक्षित सेवेचा श्रीगणेशा केला. ही सेवा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला. हिंदुस्थानातील 140 हून अधिक बँकांचे ग्राहक आपले मित्र, नातेवाईक किंवा कोणत्याही शॉपिंगसाठी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- व्हॉटस्अॅप पेमेंटसाठी केवळ यूपीआय बेस्ड डेबिट कार्डची आवश्यकता असेल. व्हॉटस्अॅपच्या नव्या अपडेटमध्ये पेमेंट फिचर्स पाहायला मिळेल. सर्व युजर्सना हळूहळू पेमेंट सेवेचा अपडेट मिळेल.
- सध्या या सेवेसाठी व्हॉटस्अॅपने अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिओ पेमेंट बँकेसोबत भागीदारी केली आहे.
- देशात यूपीआयसंबंधी पैशांचा व्यवहार वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर व्हॉटस्अॅप 2 कोटी यूजर्सच्या बरोबरीने पेमेंट सेवेची सुरुवात करू शकते, असे एनपीसीआयने मंजुरी देताना स्पष्ट केले.


























































