काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा साडेतीनशे पोते गहू पकडला; भोकरदन पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातील साडेतीनशे पोते गहू भोकरदन पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा पकडला. या कारवाई ट्रकसह जवळपास साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शासनाकडून गरीबांना वितरित करण्यात येणारा स्वस्त धान्य दुकानातील गहू भोकरदनहून सिल्लोडच्या दिशेने परराज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी अन्य सहकाऱ्यांसह रविवारी रात्री 12 वाजता भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावरील गुप्तेश्वर जिनिंगच्या बाजूला बसले होते. यादरम्यान रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सिल्लोडच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित ट्रकला त्यांनी थांबण्यास सांगितले. ट्रक चालकाने वाहन काही अंतरावर जावून थांबवले आणि पळ काढला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गव्हाने भरलेले 355 पोते आढळून आले. त्यावर गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा कॉपी ईयर 2017-18 कमोडिटी वेट राईस असा उल्लेख असून या प्रत्येकी पोत्याचे वजन अंदाजे 50 किलो आहे. याची अंदाजे किंमत 2 लाख 66 हजार 250 रुपये तर जप्त केलेल्या ट्रकची अंदाजे 10 लाख रुपये आहे. या कारवाईत एकूण साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात ट्रक चालक, मालक व ट्रकमधील गव्हाचे मालक यांच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू साठेबाजी प्रतिबंधक अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल कल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, संदीप उगले, गणेश निकम, विजय जाधव, संजय क्षीरसागर यांनी केली.