अखेरच्या षटकातील धोनीचा जुगार व टीम इंडियाने जिंकला टी-20 वर्ल्डकप…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी आजचा दिवस (24 सप्टेंबर) विशेष आहे. कारण आजच्याच दिवशी 2007मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा थरारक सामन्यात पराभव करत पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. धोनी नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 धावंनी पराभव केला होता.

टीम इंडियाच्या प्रदर्शनाने सर्वच आश्चर्यचकित
दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगलेल्या या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला अनेकांनी विजयाची दावेदार म्हटले नव्हते. कारण या संघात अनेक नवखे खेळाडू होते. परंतु सर्वांनाच आश्चर्यचकित करत टीम इंडियाने फायनलचे तिकीट मिळवले. फायनलमध्ये टीम इंडियासमोर पाकिस्तानचे आव्हान होते. याच स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाला फक्त न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला होता.

शेवटच्या षटकापर्यंत रंगला सामना
फायनलमध्ये नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवर गौतम गंभीर (75 धावा) आणि धोनी (30 धावा) यांच्या बळावर टीम इंडियाने 20 षटकात 5 बाद 157 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 158 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर हिंदुस्थानच्या दमदार गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज लोटांगण घालत होते. 16 व्या षटकात पाकिस्तानच्या 7 बाद 104 धावा झाल्या होत्या. अखेरच्या 4 षटकात विजयासाठी 54 धावांची आवश्यकता होती. मिसबाह उल-हकने हरभजनला एकाच षटकात 3 षटकार ठोकत हे अंतर 18 चेंडू आणि 35 धावा असे केले. त्यानंतर मिसबाहने दोन षटकात आतषी फलंदाजी करत अखेरच्या षटकासाठी फक्त 13 धावा ठेवल्या.

अखेरच्या षटकात धोनीने खेळला जुगार
पाकिस्तानला 6 चेंडूत 13 धावांची आवश्यकता होती आणि टीम इंडियाला एका विकेटची. धोनीने नवख्या जोगिंदरकडे चेंडू सोपवून जुगार खेळला. पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव बनली नाही. त्यानंतर मिसबाहने पुढील चेंडूवर षटकार ठोकत सामना रंगतदार केला. 4 चेंडू आणि 6 धावा असे समिकरत असताना जोगिंदरने टाकलेल्या चेंडूवर मिसबाहने उरफटा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि फसला. फाईन लेगला उभ्या असलेल्या श्रीसंतने मिसबाहचा कॅच घेतला आणि टीम इंडियाने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला.

‘क्रिकेटवाली गर्ल’! अखेर नेटकऱ्यांनी ‘त्या’ सुंदर पाकिस्तानी तरुणीला शोधलंच