पतंग उडवताना आयुष्याचा दोर तुटला, मामाच्या घरी आलेल्या अर्णवचा धक्कादायक मृत्यू

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे एक धक्कादायक घटना घडली. पतंग उडवताना मामाच्या घरी आलेल्या १४ वर्षीय अर्णवच्या आयुष्याचा दोर तुटला. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी अर्णव महेश व्यवहारे हा मकर संक्रांतीनिमित्त कोपरगाव येथे आपल्या मामाच्या घरी आला होता. अर्णव आपल्या मित्रांसोबत पतंग उडवण्यात मग्न होता. त्याच्यासोबत ऋषिकेश वाघमारे तसेच इतर काही मित्रही होते. पतंग उडवताना अचानक पतंगाची दोरी किंवा हात शेजारील हाय व्होल्टेज वीजवाहिनीला लागल्याने अर्णवला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की अर्णव जागीच कोसळला.

याचवेळी ऋषिकेश वाघमारे यालाही विजेचा झटका बसून तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अर्णवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऋषिकेशवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांत नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.