म्हणे तिसरी मोठी अर्थव्यवस्था! बैल परवडेना म्हणून शेतकऱ्याने स्वतःला नांगराला जुंपले

जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आणि देशात चुहूबाजूंनी विकासगंगा वाहत असल्याच्या बढाया सरकार मारीत असताना शेतीच्या कामासाठी बैल घेणे परवडत नसल्याने लातूरमधील अंबादास पवार या वयोवृद्ध शेतकऱयाने स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱयाची वयोवृद्ध पत्नीच औत चालवत आहे. जगाच्या पोशिंद्यावरच अशी हाराकिरीची वेळ आल्याने अवघा महाराष्ट्र हेलावला आहे.

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील अंबादास पवार या 73 वर्षीय शेतकऱयाकडे 2 एकर 9 गुंठे जमीन आहे. मुलगा पुण्यात किरकोळ काम करतो. त्यामुळे पत्नी मुक्ताबाई, सून, एक नातू आणि नात हे सर्वजणच या शेतीच्या तुकड्यावर अवलंबून आहेत.

उसनवारी करून या शेतकऱयाने कशीबशी सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली. मात्र पिकाच्या आंतरमशागत, कोळपणीसाठी पैसाच हाती नाही.

बैल घेण्याची ऐपत नाही. मजुरीसाठी बैल आणला तर दिवसाचे अडीच हजार द्यायला नाहीत. मग काय चहूबाजूंनी संसारावर आलेले संकट वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या खांद्यावरच घेतले.