हे राम… जव्हार येथे चोरट्यांनी हद्दच केली; स्मशानभूमीतील चितेचे लोखंडी स्टँडच चोरट्यांनी कापून नेले

जव्हार स्मशानभूमीची दुरवस्था झाली असतानाच आता भंगार चोरट्यांनी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले दोन लोखंडी स्टँडच चोरून नेले आहेत. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. त्यातच छताचे पत्रे तुटून लोंबकळत असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

जव्हार शहरातील स्मशानभूमीची अक्षरशः दैना झाली आहे. या स्मशानभूमीत बिडाच्या दोन शवदाहिन्या होत्या. त्यापैकी एका दाहिणीचे लोखंडी स्टँडच चोरट्यांनी चोरून नेले. तसेच दुसऱ्या दाहिणीचीही तोडफोड केली. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कसे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. तर स्मशानभूमीच्या छताचे पत्रे लोंबकळत आहेत. सोसाट्याचा वारा आला तर पत्रे पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीत केवळ एकाच पोलला लाईट आहे. शवदाहिणी धुतल्यानंतर आतील राख वाहून जाण्यासाठी गटार खोदलेली आहेत. मात्र ही राख वाहून जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली नाही. जव्हार नगर परिषदेच्या मुर्दाड कारभारामुळे मृतदेहांची हेळसांड होत असल्याने जव्हारकर संताप व्यक्त करत आहेत.