SIR वर चर्चेला सरकार का घाबरत आहे? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल

भाजप देशभरात मतचोरी करत आहे, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच बिहारमधील मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार का घाबरत आहे, असा सवालही त्यांनी केला. लोकशाही, संविधान आणि देशातील नागरिकांच्या मतांचे रक्षण करण्यासाठी या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. सरकारने यावर चर्चा घेणे गरजेचे असल्याचेही खरगे म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपला मते वाढवायची होती, त्यासाठी त्यांनी गडबड घोटाळा केला. हरियाणातही तेच केले. कर्नाटकात निवडणुकीत वेगळाच गोंधळ केला. आता बिहारमध्ये त्यांनी मतदार कमी करायचे आहेत, त्यासाठी आता मतदार पुनर्निराक्षीण ( SIR) आणले आहे. याबाबत चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अशा प्रकारे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे भूमिका घेत सरकार मतचोरी करत आहे, असा आरोप खरगे यांनी केला.

आम्हाला विशेष सघन सुधारणा प्रक्रियेवर (SIR) चर्चा हवी आहे. सर्वजण सतत सभापती, अध्यक्ष आणि सरकारला अतिशय शांतपणे विचारत आहेत की आमची मते चोरीला जाऊ नयेत… आम्हाला हे आणि मतदार यादीतील अनियमितता आणि मतांची चोरी यावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. यावर सखोल, संपूर्ण चर्चा झाली तर त्यात असलेल्या चुकी, त्रुटी दूर करता येतील. तसेच ते असंवैधानिक पद्धतीने मतचोरी करत आहेत, त्याला आम्ही प्रत्युत्तर देत विरोध करू शकतो. काही महत्त्वाच्या सूचना देऊ शकतो. त्यामुळे देशाच्या हितासाठी, विशेषतः आम्ही त्या मतदारांचे संरक्षण करू शकतो जे त्यांचे हक्क गमावत आहेत, त्यामुळे यावर चर्चा गरजेची असल्याचे ते म्हणाले.

21 जुलै 2023 रोजी तत्कालीन अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले की, या सभागृहाला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार आहे. तर आता यावर चर्चा होऊ शकत नाही, असे सांगण्यात येत आहे, असे का करण्यात येत आहे, सरकार यावर चर्चा घेण्यास का घाबरत आहे, असा सवालही त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे अल्पसंख्याकांची, दलितांची मते कापली जात आहेत, आदिवासींची मते कापली जात आहेत, मनरेगा कामगारांची मते कापली जात आहेत आणि स्थलांतरित कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असेही खरगे यांनी सांगितले.