अमेरिकेच्या एका मंत्र्यांच्या ‘हनीमून’ मुळे नागासाकी उद्ध्वस्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टोकियो

अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा तर ९ ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. या हल्ल्यामुळे जग हादरले. युद्धाचे पारडे फिरले. मात्र ही दोन शहरे उद्ध्वस्त झाली. अमेरिकेने हल्ला करण्यासाठी जी शहरे निवडली. त्यात नागासाकीचे नाव नव्हते. ऐनवेळी क्योटोचे नाव हल्ला करण्याच्या शहरांच्या यादीतून हटवून त्या यादीत नागासाकी टाकण्यात आले. याबदलाला कारीभूत ठरला तो अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा हनीमून…

जपानमध्ये पोहचल्यानंतर सैनिकांनी अणुबॉम्बची जोडणी केली. हे खूप जिकीरीचे काम असते. शत्रूच्या प्रदेशात पोहचल्यानंतरच बॉम्बची जोडणी करण्याच्या सूचना सैनिकांना देण्यात आल्या होत्या. जर अमेरिकेतच बॉम्बची जोडणी केली असती आणि त्यात थोडीशी चूक झाली असती तर अमेरिकेतच अणुबॉम्बचा स्फोट झाला असता.त्यामुळे सुरक्षेसाठी जपानमध्येच अणुबॉम्बची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जपानच्या कोणत्या शहरांना लक्ष्य करायचे याची यादी अमेरिकेने बनवली होती. त्या यादीत नागासाकीचे नाव नव्हते. या यादीत कोकुरा, हिरोशिमा, योकोहामा, निगाटा आणि क्योटो या शहारांची नावे होती. मात्र, २५ जुलैला क्योटोचे नाव हटवून त्याठिकाणी नागासाकीचे नाव टाकण्यात आले. अमेरिकेचे तत्कालीन संरक्षणमंत्री हेनरी एल स्टिमसन यांनी अखेरच्याक्षणी क्योटोचे नाव हटवून नागासाकीचे नाव यादीत समाविष्ट केले. हेनरी यांनी क्योटोमध्ये हनीमून साजरा केला होता. त्यामुळे क्योटो शहराशी त्यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी यादीतून क्योटोचे नाव हटवून तेथे नागासाकीचे नाव यादीत टाकले. त्यांच्या या निर्णयामुळे क्योटो अणुहल्ल्यातून बचावले. मात्र, नागासाकी उद्ध्वस्त झाले.

हल्ला अयशस्वी झाला असता तर…
‘एनोला गे’ या अण्वस्त्रवाहक विमानाने अणुबॉम्ब जपानपर्यंत नेण्यात आला. या विमानात अणुबॉम्बसह १२ सायनाइडच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. या कारवाईत चूक झाल्यास, हल्ला अयशस्वी ठरल्यास किंवा शत्रूच्या तावडीत सापडल्यास या गोळ्या खाण्याच्या सूचना पायलटसह विमानातील सैनिकांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हल्ला अयशस्वी ठरला असता तर वेगळेच चित्र दिसले असते.